देशभरात आज 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील एका कार्यक्रमावरून राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. इंदिरा भवन येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी वंदे मातरम् गीतही सादर करण्यात आलं. मात्र, या कार्यक्रमातील व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
भाजप प्रवक्ते आर.पी. सिंह यांनी दावा केला की, वंदे मातरम् सुरू असताना सोनिया गांधी नाराज झाल्या आणि त्यांनी गीत थांबवण्यास सांगितलं. भाजप नेते अमित मालवीय यांनीही याच मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांच्या दाव्यानुसार, वंदे मातरम् सुरू असताना सोनिया गांधी यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला, तर राहुल गांधी यांनीही ते बंद करण्याचा इशारा केला.
या आरोपांमुळे वंदे मातरम्, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. भाजपकडून काँग्रेसच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच काँग्रेसने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही वंदे मातरम् वर कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी वंदे मातरम् संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले, "ऑक्टोबर १९३७ मध्ये, वंदे मातरम संदर्भात काँग्रेस कार्यकारिणी समितीची एक बैठक झाली. गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते.
या बैठकीत, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार, काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये वंदे मातरम गायले जाईल असा निर्णय घेण्यात आला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्या ओळी वापरण्याचा सल्ला दिला होता आणि तेव्हापासून आमचे कार्यकर्ते आणि प्रत्येकजण काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये वंदे मातरम गातात. यात कोणताही वाद नाही."
त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील एका व्हिडीओ क्लिपवरून सुरू झालेला वाद आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा राजकीय संघर्ष बनला आहे. सोनिया गांधींनी वंदे मातरम् थांबवायला सांगितलं का, राहुल गांधींचा इशारा नेमका कशासाठी होता आणि व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय, यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.