Supreme Court Hearing
Supreme Court Hearing  Sarkarnama
देश

Supreme Court Hearing: हरिश साळवेंचा जोरदार युक्तीवाद; राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत बोलवता येत नाही...

सरकारनामा ब्यूरो

Shivsena News : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी आपल्या युक्तीवादात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.

हरिश साळवे यांनी युक्तीवादात पुढील मुद्दे मांडले, विधानसभेच्या अध्यक्षांना घटनात्मक अधिकार असतात. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहे. शिवसेनेत पक्षांतर्गत फूट पडलेली नाही. त्यामुळे पक्ष फुटीबाबतच्या तरतूदी या प्रकरणात लागू होणार नाहीत. सत्तासंघर्ष प्रकरणात बहुमत नसल्याने विधानसभा अध्यक्षांनी आपले पद गमावले आहे. खरा पक्ष कोणता?, हे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. बहुमत चाचणी ही राजभवनात नव्हे तर विधिमंडळात झाली. त्यामुळे बहुमत चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता येत नसल्याचेही सावळे म्हणाले.

राज्य सरकारवर अविश्वास निर्माण झाल्यास बहुमत चाचणी घेणे गैर नाही. विधानसभा अध्यक्षांना न्यायालय निर्देश देऊ शकते का?, असा सवाल अ‌ॅड. साळवे यांनी घटनापीठाला केला. राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा येण्याचे निर्देश घटनापीठ देऊ शकत नाही. गरज असेल तेव्हा राज्यपाल बहुमत चाचणीचे निर्देश देऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयात येऊन या सर्व प्रक्रिया रद्द करता येऊ शकत नाही.

विधिमंडळ, संसदेच्या सभागृह आमदार, खासदारच लोकशाहीचे प्रतिनिधीत्व करतात. बोम्मई केसमध्ये न्यायालयाने हेच निरीक्षण नोंदवले आहे. अपात्र ठरत नाही, तोपर्यंत आमदार आपले काम करू शकतात. निर्णय घेऊ शकतात. साळवे यांनी किशम मेघचंद्र सिंग विरुद्ध मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष या केसचा दाखला न्यायालयात दिला. या केसमध्ये आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे निकालात न्यायालयाने म्हटले होते.

उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काय झाले असते? एखाद्या सदस्याविरोधात अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे, म्हणून ती व्यक्ती कायदेशीररित्या काम करण्यासच अपात्र ठरते, असा निष्कर्ष न्यायालयाने कधीही काढलेला नाही, असा जोरदार युक्तीवाद साळवे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT