Subhash Phaldessai
Subhash Phaldessai  Sarkarnama
देश

उपसभापतिपदाचा सकाळी राजीनामा अन् दुपारी लागली मंत्रिपदाची लॉटरी

सरकारनामा ब्युरो

पणजी : विधानसभेच्या उपसभापतींना पदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. भाजपचे (BJP) गोव्यातील सांगे विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष फळदेसाई (Subhash PhalDessai) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. फळदेसाई यांच्यासह सुदिन ढवळीकर आणि नीळकंठ हळरणकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, आज सकाळीच फळदेसाई यांनी विधानसभेच्या उपसभापतिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे.

फळदेसाई हे मुख्यमंत्री सावंत यांचे निकटवर्ती मानले जातात. सावंत हे 2019 मध्ये मुख्यमंत्री बनल्यानंतर फळदेसाई यांना ईएसजीचे उपाध्यक्ष करण्यात आले होते. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला स्थान मिळणार याबद्दल उत्सुकता होती. यातच आज सकाळी फळदेसाई यांना पक्ष नेतृत्वाकडून निरोप मिळाला. यानुसार त्यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिला. यानंतर काही तासांतच त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली.

गोव्याच्या मंत्रिमंडळाचा (Goa Cabinet) विस्तार झाली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मंत्रिमंडळाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत शपथविधी झाला आहे. त्यावेळी सावंत यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मंत्रिमंडळात तीन जागा रिकाम्या होत्या. यात फळदेसाई, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) आणि भाजपचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर (Nilkanth Halarnkar) यांना स्थान मिळाले आहे. त्यांना राज्यपालांनी आज मंत्रिपदाची शपथ दिली.

प्रमोद सावंत यांच्यासोबत तेरा दिवसांपूर्वी आठ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. आता नव्याने तीन मंत्र्यांचा समावेश होत असल्याने त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण 12 मंत्री असतील. मंत्रिमंडळामध्ये पोंडा तालुक्यातील सर्व चार आमदारांना संधी मिळाली आहे. चाळीस आमदारांची संख्या असलेल्या विधानसभेत भाजपचे 20 आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला तीन अपक्ष आमदारांसह मगोपच्या दोन आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे मगोपला एक मंत्रिपद मिळालं आहे. नीळकंठ हळर्णकर हे 2019 मध्ये अन्य नऊ काँग्रेस आमदारांसह भाजपमध्ये आले होते. त्यांनाही मंत्रिपद देण्यात आलं आहे. गोव्यात भाजपने सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्या गळ्यात टाकली आहे. सावंत यांच्यासह 9 जणांचा शपथविधी आधी झाला होता. त्यात विश्वजीत राणे (Vishwajit Rane), मॉविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT