Amit Shah
Amit Shah  Sarkarnama
देश

Amit Shah : राज्यातील साखर कारखान्यांना संजीवनी मिळणार; अमित शाहांनी दिलं 'हे' आश्वासन

सरकारनामा ब्यूरो

Amit Shah Meeting : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील कार्यालयात आज महाराष्ट्रातील भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सहकार क्षेत्रासंबंधी चर्चा झाली आहे.

साखर उद्योगाला चालना देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, तसेच अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची स्थिती, तसेच सहकारी कारखान्यांचे नवे धोरण ठरविण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीसाठी भाजपमधील सहकार क्षेत्राशी निगडीत नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), रणजीतसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील यांच्यासह आदी नेते उपस्थिती होते.

केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. सहकारमंत्री अमित शाह यांनी याच पार्श्वभूमीवर आज बैठक बोलवली होती. या बैठकीच्या माध्यमातून राज्यातील सरकारांवर मंथन करण्यात आलं आहे. यामध्ये अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी ऊस वाहतूक व ऊस गाळप अनुदान मंजूर करण्याबाबत चर्चा झाली आहे.

तसेच ५० किमीपेक्षा अधिक वाहतुकीसाठी प्रति टन प्रति किमी ५ रुपये वाहतूक अनुदान तसेच राज्यात ५.१६ लाख टन अतिरिक्त ऊस यासह विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना कर्ज देण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील सहकार क्षेत्राच्या प्रश्नासाठी विशेष पॅकेज देण्याची तयारी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राकडे अमित शाह यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना संजीवनी मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT