BJP Latest Marathi News, Congress Latest Marathi News
BJP Latest Marathi News, Congress Latest Marathi News Sarkarnama
देश

पंजाबमधील काँग्रेसचा बडा नेता फोडल्यानंतर आता भाजपचं गुजरात अन् राजस्थानवर लक्ष

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असा इशारा देत काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) आज भाजपमध्ये दाखल झाले. भाजपचे (BJP) अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप राष्ट्रीय मुख्यालयात पक्षसदस्यत्व स्वीकारल्यावर जाखड यांनी काँग्रेस हायकमांडला थेट इशारा दिला. जाखड यांच्यानंतरही काँग्रेसमधील ‘आऊटगोईंग' सुरूच राहणार असून, यानंतर गुजरात, राजस्थानसह अनेक राज्यांतील या पक्षाचे नेते ‘काँग्रेसमुक्त भारत' मोहिमेत सहभागी होतील, असा दावा भाजप नेते करीत आहेत.

जाखड यांच्या मनातील व आचरणातील प्रखर राष्ट्रवादाच्या भावनेने त्यांना भाजपकडे आणले असल्याचे नड्डांनी सांगितले. ते म्हणाले की, जाखड यांची प्रतिमा एक प्रामाणिक नेता अशी आहे. पंजाबमध्ये राष्ट्रवादी शक्ती मजबूत करण्याची आवश्यकता आहे. जाखड हे भाजपबरोबर मिळून पंजाबला नव्या उंचीवर नेऊ शकतात.

काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष असताना कॅप्टन अमरिंदरसिंग यांना साथ देत २०१७ मध्ये जाखड यांनी राज्यात पक्षाची सत्ता आणली होती. ते गेली ३ दशके काँग्रेसचा पंजाबमधील प्रमुख आवाज होते. माजी लोकसभाध्यक्ष बलराम जाखड यांचे पुत्र असणारे सुनील जाखड हे काँग्रेसची सत्ता आली व गेली तरी काँग्रेसशी एकनिष्ठ होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ते कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वावर नाराज होते. नवज्योतसिंग सिध्दू यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर त्यांची नाराजी आणखी वाढली. त्यानंतर चरणजीतसिंग चन्नी यांना काँग्रेस नेतृत्वाने पंजाबचा मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.

जाखड हे 'आप'च्या वाटेवर असल्याचेही बोलले जात होते. मात्र, अनुभवी व संयत स्वभावाच्या जाखड यांनी भाजपबरोबर जाऊन कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा कित्ता गिरविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्याविरूध्द पक्षातील असंतोष वाढला. जाखड यांना दोन वर्षांसाठी पक्षातून निलंबित करावे, अशी शिफारस काँगरेसच्या शिस्तपालन समितीने केली होती. त्यावर हायकमांडने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, पक्षाने काही कारवाई करण्यापूर्वीच जाखड यांनी पक्षत्याग केला. जेमतेम 4 दिवसांपूर्वीच त्यांनी फेसबुक लाईव्ह करून ‘ गुड बाय, गुड लक काँग्रेस ‘ असे म्हणून पक्षाला रामराम केला. त्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाखड यांच्याशी चर्चा केली होती. जाखड यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री शहा व नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांचे आभार मानले. जाखड यांच्याप्रमाणेच काँग्रेसमधून आलेले भाजपचे दिल्लीतील प्रमुख शीख नेते मनजिंदरसिंग सिरसा यांना या वेळी आवर्जून व्यासपीठावर बोलावण्यात आले होते.

जाखड म्हणाले की, काँग्रेसशी संबंध तोडण्याचा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. मी कायम जोडत गेलो पण कधी तोडले नाही. आमच्या तीन पिढ्या गेले अर्धशतक काँग्रेससोबत राहिल्या. चांगल्या-वाईट काळात माझ्या कुटुंबाने काँग्रेसला साथ दिली. पण काँग्रेसने आता सिद्धांतांनाच मूठमाती दिल्यानं पक्षत्यागाचा निर्णय घ्यावा लागला. पंजाबला जाती-धर्माच्या नावावर विभाजित करता येणार नाही, असे मी सांगताच मला आरोपीच्या पिंजऱयात उभे केले. ते मला पदावरून हटवू शकत होते पण माझा आवाज दाबू शकत नव्हते. मी कायम राष्ट्रीयतेची भावना महत्वाची मानली. कदाचित हाच माझा गुन्हा झाला असावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT