Supreme Court News  Sarkarnama
देश

Supreme Court News : बायकोची आमदारकी नवऱ्याच्या डोळ्यात खुपली; सुप्रीम कोर्टाने नेत्याची फिरकी घेत दाखवला आरसा...

Supreme Court’s Observation on Irfan Solanki Case : शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी सोळंकी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली.

Rajanand More

Supreme Court on MLA disqualification : कोर्टाने एका गुन्ह्यात दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावल्याने एका नेत्याला आपली आमदारकी गमवावी लागली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पत्नीचा विजय झाला. पण त्यानंतर काही महिन्यांतच नव्याने थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत पुन्हा आमदारकी मिळावी, यासाठी शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली. पण सुप्रीम कोर्टाने या नेत्याला आरसा दाखवला आहे.

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते इरफान सोळंकी यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या पत्नी नसीम या सिशामाऊ मतदारसंघाच्या आमदार आहेत. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत त्या विजयी झाल्या आहेत. एका महिलेचे घर जाळल्याप्रकरणी सोळंकींसह काही जणांना कोर्टाने शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी गेली.

शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी सोळंकी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. न्यायमूर्ती सूर्य कांत, उज्जल भूयान आणि एन. कोटीश्वीर सिंग यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान कोर्ट म्हणाले की, शिक्षा झालेल्या समाजवादी नेत्याची पत्नी नसीम सोळंकी या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आता पुढील दोन वर्षे निवडणूक होणार नाही. मग पत्नीलाच पुढे आमदार म्हणून का राहू द्यायला नको, असे सांगत कोर्टाने माजी आमदाराला आरसा दाखवला.

तुमची पत्नी निवडून आली आहे. त्या गरीब महिलेला आमदार म्हणून राहू द्या. पुढील दोन वर्षे निवडणूक नाही, असे सांगत न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी मग शिक्षेला स्थगिती का द्यायची, असा सवाल केला. सोळंकी यांनी याचिकेमध्ये आपल्या मतदारसंघातील २ लाख ७० हजार नागिरकांना त्रास सहन करावा लागेल, असे म्हटले होते. त्या आधारावरही त्यांनी शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली होती. जेणेकरून पुन्हा आमदारकी मिळू शकेल.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान वकिलांना हायकोर्टात जाण्याच्या सूचना केल्या आम्ही हायकोर्टाल याप्रकरणी पुढील सहा महिन्यांत आदेश देण्याबाबत सूचना करू, असेही कोर्ट म्हणाले. सुप्रीम कोर्टाने सोळंकी यांच्या याचिकेवर यापुढेही सुनावणी घेण्याची तयारी दर्शवत पुढील तारीख दिली. मागील वर्षी कानपूर नगर सत्र न्यायालयाने सोळंकी यांना शिक्षा ठोठावली आहे. त्याविरोधात त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात केलेली याचिका फेटाळण्यात आली होती. पण त्यांना कोर्टाने जामीन दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT