Chief Justice Dhananjay Chandrachud Sarkarnama
देश

Chandigarh Mayor Election : सुप्रीम कोर्टाचा भाजपला झटका; आधीच्या मतदानावरच निकालाचे संकेत

Rajanand More

New Delhi News : चंदीगड महापौर निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने सोमवारी भाजपला मोठा झटका दिला आहे. मतपत्रिकांवर फुली मारल्याची कबुली निवडणूक अधिकाऱ्याने दिल्यानंतर कोर्टाने आधीच्या मतदानानुसारच मतांची मोजणी करून निकाल जाहीर करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. तसे झाल्यास आप व काँग्रेस आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. याबाबत मंगळवारी कोर्टाकडून आदेश दिला जाऊ शकतो. (Chandigarh Mayor Election)

चंदीगड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीच्या आठ मतपत्रिका अवैध ठरवण्यात आल्याने भाजपच्या (BJP) उमेदवाराचा विजय झाला. याविरोधात आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनिल मसिह यांनी आज कोर्टात हजेरी लावली. सुनावणीदरम्यान त्यांनी आठ मतपत्रिकांवर फुली मारल्याची कबुली दिली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhanajay Chandrachud), न्यायाधीश जे. बी. पारदीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोर्ट म्हणाले, आधीच मतदान झाले आहे. नव्याने निवडणूक घेण्यापेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या फुल्या गृहित न धरता मतांची मोजणी केली जाऊ शकते. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास महापालिकेच्या उपायुक्तांना सांगितले जाईल. न्यायालयाच्या देखरेखीखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंदीगड महापालिका प्रशासनाने मात्र नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर कुलदीप कुमार यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. आधी झालेल्या मतदानानुसार मतमोजणी घेतली जावी. मतपत्रिका बाद ठरवण्यासाठी तीन अटी आहेत. या तीनही अटींचे उल्लंघन झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व मतपत्रिका मंगळवारी सकाळी 10.30 वाजता सादर करण्याचे आदेश कोर्टाने या वेळी दिले. सर्व मतपत्रिका कोर्टाकडून तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर कोर्टाकडून मतदानाबाबत आदेश दिला जाऊ शकतो. आधीच्या मतदानानुसारच मतमोजणी करण्याचे आदेश कोर्टाने दिल्यास कुलदीप कुमार हे महापौरपदाच्या खुर्चीवर बसतील.

...तर आघाडीवर नामुष्की

दरम्यान, आजच्या सुनावणीआधी भाजपचे नवनियुक्त महापौर मनोज सोनकर यांनी रविवारी रात्री उशिरा राजीनामा दिला आहे. 30 जानेवारीला त्यांची महापौरपदी निवड झाली होती. तसेच आपच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची महापालिकेतील ताकद वाढली आहे, पण न्यायालयाने आधीच्याच मतदानानुसार निकाल जाहीर करण्यास सांगितल्यास या नगरसेवकांनाही धक्का बसणार आहे, तर नव्याने निवडणूक झाल्यास आघाडीवर नामुष्की ओढावू शकते. सध्या भाजपचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT