Auto Driver Vijay Dhamu Sarkarnama
देश

Auto Driver Vijay Dhamu : थलपतीने हाती दिलं राजकीय स्टेरींग : तामिळनाडूत रिक्षा चालक झाला आमदार, दिग्गज नेत्याचा पराभव

TamilNadu Election : संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजय याच्या टीव्हीके पक्षाने मोठा विजय संपादन केला आहे. पक्षाचा एक रिक्षा चालक आमदार झाला आहे.

Ganesh Sonawane

Tamilnadu Election : लोकशाहीत जनता हीच खरी मालक असते, असे म्हटले जाते. एकदा का जनतेने मनात आणले तर काहीही होऊ शकतं याचा पुन्हा एकदा प्रत्यय तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालातून आला आहे. तामिळनाडूच्या उत्तर चेन्नईतील रॉयापूरम मतदारसंघात असाच राजकीय चमत्कार पाहायला मिळाला आहे. येथे एका सामान्य ऑटो चालकाने अशी कामगिरी करून दाखवली, ज्याची कल्पनाही मोठमोठे राजकीय दिग्गज करू शकले नसते.

थलपती यांच्या 'तामिळगा वेत्री कळघम' TVK पक्षाचे उमेदवार विजय धामू यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असून, थलपती यांच्या लाटेत सामन्य चेहऱ्याने मिळवलेला हा विजय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

विजय धामू हे कुठलेही मोठे राजकीय नेते नसून, स्वतः मेहनत करून ऑटो चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे एक सर्वसामान्य नागरिक आहेत. मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर होताच त्यांच्या विजयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी आपल्या या ‘ऑटोच्या वेगावर’ तमिळनाडूच्या राजकारणातील दिग्गजांनाही मागे टाकले.

धामू यांनी AIADMK पक्षाचे माजी मंत्री डी. जयकुमार यांचा पराभव करत मोठा धक्का दिला. याशिवाय, DMK पक्षाचे सुबैर खान—जे माजी मंत्री रहमान खान यांचे सुपुत्र आहेत—यांनाही त्यांनी मागे टाकले. तब्बल 14 हजार मतांच्या फरकाने विजय धामू विजय झाले आहेत. दोन बलाढ्य राजकीय घराण्यांच्या उमेदवारांना हरवत धामू यांनी मिळवलेला हा विजय विशेष ठरत आहे.

एकीकडे अनेक वर्षांचा अनुभव, मजबूत राजकीय वारसा आणि मोठ्या पक्षांचे पाठबळ असलेले उमेदवार होते; तर दुसरीकडे विजय धामू—ज्यांच्याकडे केवळ जनतेचा विश्वास आणि रोज रस्त्यावर धावणारा त्यांची ऑटोरिक्षा होती. रॉयापूरमच्या मतदारांनी यावेळी कोणत्याही मोठ्या चेहऱ्याला नव्हे, तर आपल्या मधील एका सामान्य माणसाला निवडून दिले.

तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने केलेल्या दमदार एन्ट्रीमुळे राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडताना दिसत आहे. विजय धामू यांचा हा विजय आता नव्या राजकारणाचे प्रतीक ठरत आहे. कालपर्यंत रस्त्यावर प्रवासी वाहून नेणारा हा ऑटोचालक आज जनतेच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार बनला आहे.

थलपतींना मानतो आदर्श

व्यवसायाने ऑटो चालक असलेले विजय धामू यांना विजय थलपती यांनी आपल्या पक्षाकडून तिकीट जाहीर केलं. त्याचवेळी धामू यांनी हे स्पष्ट केले होते की, ते केवळ एक उमेदवार नसून दीर्घकाळ बदलाची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेचा आवाज आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी थेट जनतेमध्ये जाऊन संवाद साधला. त्यांच्या साधेपणामुळे मतदारांची मने जिंकण्यात ते यशस्वी ठरले.

TVK पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांना आपला आदर्श मानणाऱ्या धामू यांनी प्रचारावेळी ‘थलपती विजय’ हेच आपले बळ असल्याचे सांगितले होते. तसेच, जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT