Tamil Nadu Power Game : तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेला काही मुहूर्त लागत नव्हता. टीव्हीकेचे प्रमुख जोसेफ विजय यांच्याशी शेवटपर्यंत तडजोड करण्यात व्यस्त असलेल्या व्हीसीके पक्षानं अखेर विजयला अधिकृतरित्या आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर IUML या पक्षानं टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं ११८ हा बहुमताचा आकडा गाठल्यानं आता जोसेफ विजय यांचा सत्तास्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा चौथ्यांदा विजय हे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील त्यानंतर राज्यपालांकडून त्यांना निमंत्रण देण्यात येईल. पण ही प्रक्रिया झाल्यानंतर आजच तातडीनं विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी देखील होऊ शकतो. कारण आधीच या प्रक्रियेला उशीर झाला आहे. परंतू याबाबत अद्याप कुठलंही स्पष्टीकरण टीव्हीकेकडून आलेलं नाही.
व्हीसीकेचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनी पाठिंब्याचं अधिकृत पत्र टीव्हीकेचे नेते आधव अर्जुन यांच्याकडून सुपूर्द केलं. त्यामुळं व्हीसीकेनं टीव्हीकेला सत्तास्थापनेसाठी आपली पाठिंबा जाहीर केल्यानंतर टीव्हीकेच्या समर्थकांनी जल्लोष केला. कालच दोन्ही डाव्यापक्षांसह व्हीसीकेनं आपला पाठिंबा जाहीर केल्याचं वृत्त आलं होतं. त्यामुळं काल विजय यांनी आपल्या बहुमताच्या आकड्यासह तिसऱ्यांदा राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. पण अचानक रात्री उशीरा व्हीसीकेनं घुमजाव करत आपण अद्याप अधिकृतरित्या असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं सांगत तामिळनाडूच्या पावरगेममध्ये ट्विस्ट आणला होता. त्यामुळं शनिवारी सकाळी ११ वाजता शपथविधीची वेळ जाहीर होऊनही जोसेफ विजय यांच्यावर ही वेळ रद्द करण्याची पुन्हा नामुष्की ओढवली होती.
दरम्यान, व्हीसीकेनं आपल्या पाठिंब्याच्या बदल्यात विजय यांची एक विधानसभा पोटनिवडणुकीची जागा, एक खासदारकीची जागा तसंच उपमुख्यमंत्रीपद आणि एक कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केल्याची चर्चा होती. पण या मागणीबाबत अधिकृतरित्या व्हीसीकेकडून कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. पण आता हा बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचं पक्षानं जाहीर केलं आहे.
दरम्यान, टीव्हीकेचे १०७, काँग्रेस - ५, सीपीआय - २, सीपीएम - २ आणि व्हीसीके - २ जागा अशा मिळून ११८ जागांचं बहुमत आता जोसेफ विजय यांच्याकडं जमा झालं आहे. तामिळनाडूच्या २३४ सदस्यांच्या विधानसभेसाठी ११८ जागा हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळं आता हा बहुमताचा आकडा गाठल्यानं जोसेफ विजय हे लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पण हा शपथविधी सोहळा कधी होईल हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.