

Maharashtra SIR: पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेमुळं मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होत असलेल्या एसआयआर प्रक्रियेत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एमआयएम पक्षानं मोठं पाऊल उचललं आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आज छत्रपती संभाजी नगर इथं भेट दिली त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतचा तपशील सांगितला.
पत्रकारांशी बोलताना ओवैसी म्हणाले, एसआयआर संदर्भात कसं काम करायला पाहिजे यासाठी आज इथं कार्यशाळा आयोजित केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या २७ लाख मतदारांना मतदान करता आलं नाही, त्यात ९० टक्के मुस्लिमांची नावं होती. याची पुनरावृत्ती महाराष्ट्र टाळण्यासाठी आम्ही एक मोबाईल अॅप बनवलं आहे, सध्या हे अॅप आम्ही तेलंगणामध्ये वापरत आहोत. त्यासंदर्भातील सर्व माहिती अॅपमध्ये दिली जाणार आहे. यात घर क्रमांक किंवा 2002 मधे तुम्ही कुठे होता? याची माहिती मिळणार आहे. तसंच मतदाराचे आणि त्याच्या वडिलांचे नाव टाकल्यास त्याची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.
या एसआयआर संदर्भात आम्ही जे काही करत आहोत ते सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार आहे, असा दावाही ओवैसी यांनी केला आहे. एसआयआरची प्रक्रिया करण्यासाठी खूपच कमी वेळ आहे. महिन्याभरात आम्हाला ही प्रक्रिया करायची आहे. यासाठी आम्ही परिपूर्ण अँड्रॉईड बेस्ड अॅप बनवत आहोत, त्यात सर्व रेकॉर्ड आहे, हे अॅप पूर्णपणे मोफत असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात जिथे जिथे आमच्या पक्षांचे अॅक्टिव्ह युनिट आहेत तिथं आम्ही हेल्पडेस्क सेंटर बनविणार आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, एमआयएमकडून विकसित करण्यात येत असलेल्या अॅपचा उद्देश हा मुस्लिम नागरिकांचा डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा हा आहे. तसंच त्यांच्या नावांसंदर्भात किंवा पत्त्यांसदर्भात काही अडचणी असतील तर त्या देखील वेळीच सुधारल्या जाणार आहेत. यामुळं खरोखरच अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या मुस्लिम मतदारांची नावं अंतिम मतदार याद्यांमधून वगळण्याची नामुष्की ओढवणार नाही, असंही एमआयएमकडून सांगण्यात आलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेत मृत्यू पावलेले, चुकीचा पत्ता असलेले, स्थलांतरीत झालेले आदी कारणांमुळं एकूण ९१ लाख मतदारांची नाव मतदार याद्यांमधून वगळण्यात आली होती. ही मतं पश्चिम बंगालच्या एकूण मतदारांच्या १२ टक्के होती. यामध्ये हिंदूंची ५७.५ टक्के होती तर मुस्लिमांची ३१.१ टक्के मतं होती. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत २७ टक्के आहे. या २७ टक्क्यांपैकी ३१ लाख मुस्लिमांची नाव वगळल्यानं त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ३४ टक्के मुस्लिमांची नाव वगळण्यात आली होती. दरम्यान, या एकूण ९१ लाखांपैकी इतर तांत्रिक कारणांमुळं २७ लाख मतदारांची नाव वगळण्यात आली होती. या नावांसाठी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. यांपैकी काही जणांना पुन्हा फॉर्म भरुन मतदानाची संधी देण्यात आली पण लाखो लोकांना पुढच्यावेळी मतदान करण्याचा सल्ला देण्यात आला. याचा मोठा फटका तृणमूल काँग्रेसला बसला आणि त्यांनी राज्यातील सत्ता गमावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.