Congress Breaks Alliance With DMK; MK Stalin, Rahul Gandhi and Thalapathy Vijay sarkarnama
देश

Tamilnadu Politics : थलापती विजयला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचा 'द्रमुक'सोबत दगाफटका? वाचा 55 वर्षांचा राजकीय इतिहास

Congress Breaks Alliance With DMK In Tamil Nadu : तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजयच्या प्रवेशाने सत्ता समीकरणे बदलली असून काँग्रेसने द्रमुकसोबत असणारी ५५ वर्षांची युती तोडली आहे. यामुळे काँग्रेसने रणनीती बदलली तामिळनाडूत मोठा राजकीय भूकंप आल्याचे बोलले जात आहे.

Aslam Shanedivan

  1. काँग्रेस आणि द्रमुक यांची तब्बल ५५ वर्षांची युती तामिळनाडूत तुटल्याची चर्चा रंगली आहे.

  2. थलपती विजय यांच्या TVK पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे काँग्रेसने नवे राजकीय समीकरण स्वीकारले.

  3. २०२६ च्या निवडणुकीपूर्वी तामिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

TVK Congress Alliance : तामिळनाडू निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत. थालापती विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाला सत्तास्थापनेसाठी 11 आमदारांची गरज असतानाच काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ‘टीव्हीके’सोबत हातमिळवणी करण्यासाठी काँग्रेसने ‘द्रमुक’सोबतची ५५ वर्षांची मैत्री तोडली आहे.  ‘द्रमुक’च्या काही नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत काँग्रेसने विश्वासघात केल्याचे म्हटले होते. काँग्रेस नेत्यांकडून मात्र या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. 

गेल्या ५५ वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला असता काँग्रेस आणि द्रमुकचे संबंध नेहमीच चढ-उताराचे राहिले आहेत. ‘द्रमुक’ने १९६७ मध्ये हिंदीविरोधी आंदोलन आणि संघराज्यवादाच्या मुद्द्यावर काँग्रेसचा पराभव करून पहिल्यांदा सत्ता मिळविली. मात्र, १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर १९७१ च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गटाला ‘द्रमुक’ने साथ देण्याचा निर्णय घेतला.

पुढील काळात एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी ‘अण्णाद्रमुक’ची स्थापना केल्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांच्याशी युती केली. या युतीने १९७७ च्या निवडणुकीत राज्यामध्ये मोठे यश मिळविले. मात्र, १९७९ मध्ये एमजीआर यांनी तंजावर पोटनिवडणुकीत इंदिरा गांधींना पाठिंबा देण्यास नकार दिल्याने ही युती तुटली.

काँग्रेस पुन्हा १९८० मध्ये ‘द्रमुक’कडे वळली पण चारच वर्षांत पुन्हा ‘अण्णाद्रमुक’शी आघाडी केली. जयललिता यांच्या काळातही काँग्रेसने १९९० च्या दशकात अण्णाद्रमुकशी युती केली होती. मात्र १९९८ मध्ये जयललिता यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपशी युती केली. पण १९९९ मध्ये जयललिता यांनीच एका मताने वाजपेयी यांचे सरकार पाडले होते.

‘द्रमुक’ने त्याच वर्षी पहिल्यांदा भाजपसोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सामील होण्याचा निर्णय घेतला होता. ‘द्रमुक’ने २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’मध्ये प्रवेश केला. द्रमुक २००४ ते २०१४ या काळामध्ये ‘यूपीए’ सरकारचा महत्त्वाचा घटक होता. टू-जी स्पेक्ट्रम गैरव्यवहाराच्या चौकशीमुळे या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. ‘द्रमुक’च्या ए. राजा आणि कनिमोळी या नेत्यांनाही तुरुंगवास भोगावा लागला होता.

श्रीलंकेतील तमिळी वाघांच्या मुद्द्यावरून २०१३ मध्ये ‘द्रमुक’ने काँग्रेसशी नाते तोडले होते, मात्र २०१६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले होते. थोडक्यात काही अपवाद वगळता गेली ५५ वर्षे काँग्रेस आणि द्रमुकची युती होती. पण २०२६ मध्ये विजय यांच्या ‘टीव्हीके’च्या उदयामुळे तामिळनाडूच्या राजकारणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले आहे. काँग्रेसने द्रमुकची साथ सोडत ‘टीव्हीके’ला पाठिंबा दिला आहे.

FAQs :

1. काँग्रेस आणि द्रमुकची युती किती वर्षांची होती?
काँग्रेस आणि द्रमुकची युती जवळपास ५५ वर्षांपासून कायम होती.

2. काँग्रेसने द्रमुकची साथ का सोडली?
थलपती विजय यांच्या TVK पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे काँग्रेसने नवे राजकीय समीकरण स्वीकारल्याची चर्चा आहे.

3. TVK पक्षाचे नेतृत्व कोण करत आहे?
TVK पक्षाचे नेतृत्व अभिनेता थलपती विजय करत आहेत.

4. तामिळनाडूच्या राजकारणात याचा काय परिणाम होऊ शकतो?
यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सत्ता समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.

5. द्रमुक आणि काँग्रेसची युती कधी सुरू झाली होती?
१९७१ च्या निवडणुकीपासून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय सहकार्य सुरू झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT