Congress Sarkarnama
देश

Congress News : प्राप्तिकरची काँग्रेसला तिसरी नोटीस; कर वसुली गेली 3 हजार 567 कोटींवर...

Rajanand More

New Delhi : प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला (Congress News) आज तिसरी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. आतापर्यंत काँग्रेसला तब्बल 3 हजार 567 कोटींच्या कर वसुलीची नोटीस पाठवली आहे. आधीच पक्षाची बँक खाती गोठवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे नसल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच विभागाकडून सातत्याने नोटीस पाठवली जात असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे.

प्राप्तिकर विभागाने (Income Tax) आज काँग्रेसला 2014 ते 2017 या कालावधीसाठी 1745 कोटी रुपयांच्या कराची मागणी केली आहे. या नव्या नोटिशीमुळे काँग्रेसकडील (Congress) थकीत कराची रक्कम 3567 कोटींवर पोहचली आहे. 2014-15 साठी 663, 2015-16 साठी 664 आणि 2016-17 साठी 417 कोटींच्या कराची मागणी या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.

काँग्रेसला दोन दिवसांपुर्वी दुसरी नोटीस आली होती. त्यातून 1823 कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली आहे. हा कर 2017-18 ते 2020-21 या वर्षातील आहे. कराच्या रकमेवर दंड आणि व्याजही लावण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाच्या या भूमिकेवर काँगेस नेत्यांनी टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे नेते विवेक तन्खा यांनी एक्स हँडलवरून टीका करताना म्हटले आहे की, ही वेडेपणाची पराकाष्ठा आहे. मागील तीन दिवसांत काँग्रेसकडे 3567.33 कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसमुक्त भारत या भाजपच्या (BJP) मिशनसाठी त्यांच्या निष्ठावान प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांचे धन्यवाद, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, प्राप्तिकर विभागाने काँग्रेसची बँक खातीही गोठवली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी पैसे नसल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांकडूनही या मुद्यांवरून भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. काँग्रेसकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे नसल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT