Telangana CM Residence Sarkarnama
देश

Congress : शपथविधी सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर बुलडोझर; काय आहे प्रकरण?  

Revanth Reddy : मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत बंगल्याबाहेर लोखंडी बॅरिकेड्स उभारले होते.

Rajanand More

Telangana CM : तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या घराबाहेर बुलडोझर, ट्रॅक्टर, अनेक कामगार जमा होऊ लागले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण ही सगळी जमवाजमव सुरू होती ती मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्याबाहेरील लोखंडी बॅरिकेड्स हटविण्यासाठी. रेवंथ रेड्डी यांनी प्रचारादरम्यान ही बॅरिकेड्स हटविण्याचे आश्वासन दिले होते. शपथविधी सुरू असतानाच त्यांनी आपले पहिले आश्वासन पूर्ण केले.

के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री असताना हैदराबादमधील प्रगती भवन येथील मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत बंगल्याबाहेर लोखंडी बॅरिकेड्स उभारले होते. त्यामुळे सहजासहजी कुणालाही या बंगल्यात प्रवेश मिळत नव्हता. केसीआर अनेक वेळा त्यांच्या फार्महाऊसवरच असायचे. त्यामुळे त्यांच्यावर फार्महाऊस मुख्यमंत्री अशी टीका प्रचारादरम्यानही झाली होती.

रेवंथ रेड्डी यांनी प्रचारादरम्यान काँग्रेसची सत्ता आल्यास बॅरिकेड्स हटवले जातील, असे आश्वासन दिले होते. आज त्यांनी मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यानंतर मिनीटभरातच मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर बॅरिकेड्स हटवण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली. इतर मंत्र्यांचा शपथविधी सुरू असतानाच ही बॅरिकेड्स हटवण्याचे कामही सुरू झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रेड्डी यांच्या या पहिल्याच निर्णयाचे तेलंगणातील नागरिकांनी स्वागत केले आहे. आता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सर्वांसाठी खुले असेल, अशी आशा मतदारांना आहे. दरम्यान, काँग्रेसने प्रचारादरम्यान सहा मोठी आश्वासने दिली होती. या सहा गॅरंटी योजनांच्या फाइलवरही रेड्डी यांनी सही करत आश्वासन पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग महिलांना नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी पूर्ण केले आहे. 

काँग्रेसच्या सहा गॅरंटी योजना कोणत्या ?

महालक्ष्मी योजना : महिलांना दरमहा 2500 आणि 500 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार. तसेच महिलांना राज्य परिवहन टीएसआरटीसी (TSRTC) बसमध्ये मोफत प्रवास मिळणार.

रायथू भरोसा योजना : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपये आणि शेतमजुरांना 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार.

ज्योती योजना : अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज दिली जाणार.

इंदिरम्मा इंदलू योजना : ज्या कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही, त्यांना घरासाठी जमीन आणि 5 लाखांची आर्थिक मदत मिळणार.

युवा विकास योजना : विद्यार्थ्यांना 5 लाख रुपयांची मदत केली जाणार. या रकमेचा उपयोग विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची फी भरण्यासाठी होईल.

चेयुथा योजना : वृद्ध आणि दुर्बलांना 4,000 रुपये पेन्शन दिली जाणार.

(Edited by – Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT