हैदराबाद : गणवेश सक्तीचा असलेल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (Hijab) घालण्यास कर्नाटकात (Karnataka) बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून त्याचे लोण आता देशभर पसरू लागले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही काही खासदारांनी हा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचं लक्ष वेधलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही (Supreme Court) हे प्रकरण गेलं आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची मुलगी माजी खासदार कविता कलवकुंटला (kavitha kalvakuntla) यांनीही या वादावर कविता लिहित विरोधकांना टोले लगावले आहेत. हम सब हिंदूस्थानी असं या कवितेचं शीर्षक असून यातून त्यांनी देशात सर्वधर्मसमभाव आणि समानतेची आठवण करून दिली आहे. ही कविता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कविता यांनी या ओळी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहित ट्विटरवर पोस्ट केल्या आहेत.
कुंकू लावणं हा जसा माझा अधिकार आहे, तसंच मुस्कानलाही हिजाब घालण्याचा अधिकार आहे. काय घालावं, हे महिलांना ठरवू द्या, असं कविता यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी #DontTeachUs हा हॅशटॅगही वापरला आहे. 'हिंदू-मुस्लिम-शीख-ईसाई, चाहे हम किसी भी धर्म के हों, हम हिंदुस्थानी है,' असं कविता यांनी पहिल्या तीन ओळींमध्ये लिहिलं आहे. सिंदूर-पगडी-हिजाब-क्रॉस, आम्हीही काहीही घालू, आपण हिंदूस्थानी आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कविता कलवकुंटला यांनी पुढे रविंद्रनाथ टागोर, मोहम्मद इक्बाल, आबिद हसन सफरानी यांचेही दाखले दिले आहेत. हे आपल्या सर्वांना सांगून गेलेत की, आपण सर्व हिंदुस्थानी आहोत, असा कवितेचा शेवट करण्यात आला आहे. दरम्यान, हिजाब बंदीच्या निर्णयावरून कर्नाटकात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यातील शाळा व महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली.
विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापन तसेच कर्नाटकमधील नागरिकांनीही राज्यात शांतता राखावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचेही बोम्मई यांनी सांगितले. उडपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थींनींचा एक गट आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गट समोरासमोर आले होते. त्यावेळी उपरणं घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये घोषणाबाजी करत निदर्शने केली होती. यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.