Legislative council news : देशातील विविध राज्यांचे राज्यपाल आणि राज्य सरकारामधील टोकाचे वाद नवे नाहीत. या वादातून महत्वाची विधेयके, आमदारांच्या नियुक्ती रखडल्याचे अनेकदा समोर आले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळातही असेच घडले होते. राज्य सरकार आणि राज्यपालांमधील हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या वादामुळे एका बड्या नेत्याचे मंत्रिपद धोक्यात आले होते.
तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी शनिवारी राज्य सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. यामध्ये काँग्रेसचे नेते व माजी किक्रेटपटू मोहम्मद अझरूद्दीन आणि तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या चळवळीतील अग्रणी प्रा. के. कोडानदराम या दोघांचा समावेश आहे.
मंत्रिपद होते धोक्यात
अझरुद्दीन यांनी ३१ ऑक्टोबर २०२५ मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यावेळी ते विधानसभा किंवा विधानपरिषद या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. संविधानिक तरतुदींनुसार कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्तीने मंत्रिपदाची शपथ घेतल्यास त्यांना पुढील सहा महिन्यांत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचे मंत्रिपद जाऊ शकते.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अझरुद्दीन यांच्याकडे अल्पसंख्याक कल्याण आणि सार्वजनिक उपक्रम ही खाती देण्यात आली होती. खरंतर त्याआधीच ऑगस्ट महिन्यांत तत्कालीन राज्यपाल जिश्नू देव वर्मा यांच्याकडे अझरुद्दीन यांच्यासह दोघांच्या नावांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस करण्यात आली होती. पण सात महिने त्यावर निर्णय झाला नाही.
वर्मा यांच्याजागी मार्च महिन्यात शिव प्रताप शुक्ला राज्यपाल म्हणून आले. त्यानंतर पुन्हा एकदा हालचालींना वेग आला. प्रामुख्याने अझरुद्दीन यांना ३० एप्रिलपर्यंत आमदारकीची शपथ घेणे बंधनकारक होते. ही मुदत संपत आल्याने काँग्रेससह अझरुद्दीन यांची धडधड वाढली होती. त्यामुळे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी थेट राज भवन गाठत राज्यपालांना दोघांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्याची विनंती केली होती.
रेवंध रेड्डी यांच्या भेटीनंतर आठवडाभरातच राज्यपालांनी दोघांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे अझरुद्दीन यांचे मंत्रिपद वाचणार आहे. आता ते पुढील एक-दोन दिवसांत आमदारकीची शपथ घेण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी नियुक्ती मंजूर केली नसती तर अझरुद्दीन यांचे मंत्रिपद आपोआप गेले असते. काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरला असता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.