BRS MLA Nanditha Dies In Accident Sarkarnama
देश

BRS MLA Lasya Nanditha Dies In Car Accident : दहा दिवसांपूर्वीच बचावलेल्या आमदार नंदिता यांना अखेर अपघाताने गाठलेच

सरकारनामा ब्यूरो

Lasya Nanditha Dead : भरधाव कार रस्ता दुभाजकावर आदळल्यामुळे भारत राष्ट्र समितीच्या आमदार लास्या नंदिता (वय 37) यांचा जागीच मृ्त्यू झाला. सिकंदराबाद कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असलेल्या लास्या नंदिता या आपल्या एसयूव्हीमधून निघाल्या होत्या.

शुक्रवारी सकाळी संगारेड्डी जिल्ह्यातील पटनचेरू येथे आउटर रिंगरोडवर हा भीषण अपघात झाला. आमदारकीची त्यांची ही पहिलीच टर्म होती. दहा दिवसांपूर्वीच त्या एका अपघातातून बचावल्या होत्या. (Telangana BRS MLA Nanditha Dies In Road Accident)

अपघातात लास्या नंदिता गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. पाच टर्म आमदार राहिलेल्या जी. सायन्ना यांच्या त्या कन्या होत. सायन्ना यांचे गेल्या वर्षी निधन झाले आहे.

लास्या नंदिता बसरा येथून गच्चीबौलीकडे निघाल्या होत्या. चालकाला डुलकी लागली आणि हा भीषण अपघात झाला असावा, असा संशय संगारेड्डीचे पोलिस अधीक्षक सी. एच. रूपेश यांनी व्यक्त केला आहे. कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. त्यांचा अंगरक्षकही जखमी झाला आहे. हा अपघात अतिवेगामुळे झाला की अन्य वाहनामुळे हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

1996 मध्ये जन्मलेल्या लास्या नंदिता यांनी दहा वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला होता. विधानसभेची निवडणूक लढवण्यापूर्वी त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. गेल्या वर्षी झालेल्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या.

नंदिता यांनी भाजप (BJP) उमेदवाराचा 17 हजार मतांनी पराभव केला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, बीआरएसचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chandrashekar Rao) यांना लास्या यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. नलगोंडा येथे के. सी. चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून परत येत असताना दहा दिवसांपूर्वीच त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता.

लास्या नंदिता (Lasya Nanditha) यांच्यासोबत झालेला हा पहिलाच अपघात नव्हता. डिसेंबर २०२३ मध्ये नंदिता या एका लिफ्टमध्ये अडकल्या होत्या. ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्टमध्येच बंद पडली होती. त्यामुळे त्या २० मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्या होत्या.

दहा दिवसांपूर्वीच्या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या होत्या, मात्र एका होमगार्डचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांचे वडील जी. सायन्ना यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT