संजय परब
Mumbai News: काँग्रेसचे सरकार जाऊन 1995 मध्ये शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आले आणि या युतीचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. पण, ते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पहिल्या पसंतीचे मुख्यमंत्री नव्हते. त्यांना सुधीर जोशी यांना मुख्यमंत्री करायचे होते. मनोहर आणि सुधीर हे मामा-भाचे.
अगदी शेवटी भाचे सुधीर यांचे नाव बाजूला पडले आणि मामा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पण, त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असले तरी रिमोट मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहिला…अगदी पहिल्या दिवसापासून! दोन सत्ताकेंद्र असलेल्या या सत्ताकारणाचा शेवटसुद्धा तसाच झाला… बाळासाहेब यांनी एक आदेश काढला आणि जोशी यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. (Former Maharashtra CM Manohar Joshi passes away)
1999 जानेवारीचा शेवटचा आठवडा.'वर्षा' आणि 'मातोश्री' बंगल्यांमधला तणाव अगदी टोकाला गेलेला. वर्षा बंगल्यातल्या मुख्यमंत्र्यांना 'मातोश्री'मध्ये राहणाऱ्या साहेबांकडून एक मोजक्या शब्दांतला संदेश आला आणि मनोहर जोशी यांनी आपलं पद सोडलं....वरवर गिरीश व्यास प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला, असं चित्र उभं राहिलं तरी दोन्ही सत्ताकेंद्रांत त्याआधीपासून संघर्ष होत होताच. त्यातलं एक केंद्र होतं मुख्यमंत्र्यांचं आणि दुसरं होतं त्यांच्या पक्षप्रमुखांचं.
साधारणतः प्रादेशिक पक्षांमध्ये एखाद्या राज्याची सत्ता आली की त्या पक्षाचे प्रमुखच मुख्यमंत्री होतात. पण महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार 1995 मध्ये आल्यावर असं झालं नाही. युतीतला तेव्हा जास्त संख्याबळ असणारा पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री होण्याऐवजी ते पद दुसऱ्या नेत्याला द्यायचं ठरवलं. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्रिपदी भाजपचे गोपीनाथ मुंडे आले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी उघडपणे सरकारचे 'रिमोट कंट्रोल' होण्याचा निर्णय घेतला.
शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधीत राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. सेना भाजपच्या नेता निवडीच्या आदल्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी, "मला ऊठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवा आहे! मुख्यमंत्री कोणीही होवो, सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हाती राहणार आहे!" त्यामुळे महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्रं तयार होणार आणि या केंद्रांमध्ये वादाच्या ठिणग्या उडत राहणार याचे संकेत मिळाले होते.
एका बाजूला युतीचं सरकार, दुसरीकडे निवडणुकीत दिलेली आव्हानात्मक आश्वासनं पूर्ण करणं आणि शिवसेनाप्रमुखांच्या अपेक्षा पूर्ण करणं, अशी तिहेरी जबाबदारी त्यांच्याकडे होती. युतीमध्ये भाजपलाही त्यांना सांभाळायचं होतं. शिवसेनाप्रमुखांशी त्यांचे अधूनमधून वादाचे प्रसंग उद्भवू लागले. दाभोळमधील एन्रॉन वीज प्रकल्पाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं दशक ढवळून काढलं. त्याचा राजकीय मुद्दा झालाच तर तो प्रकल्प रद्द करू, असं युतीने आपल्या प्रचार सभांमध्ये सांगितलं होतं.
या मुद्द्यांवर घडलेली एक घटना शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री यांच्यातील वादाची ठिणगी ठरली. युतीचे सरकार आल्यावर एन्रॉन अरबी समुद्रात बुडवला जाऊ नये म्हणून त्या कंपनीच्या भारतातील प्रमुख रिबेका मार्क मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भेटायला येणार होत्या.
मात्र, त्या उशिरा आल्यामुळे मुख्यमंत्री जोशींनी संतापून ती बैठकच रद्द केली. वास्तविक रिबेका मार्क त्याचवेळेस मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करत होत्या. मात्र, या घटनेतून विपरीत अर्थ काढण्यात आला.
मुख्यमंत्री बदलले जाणार अशी चर्चा व्हायची. मग दोन्ही नेत्यांची मातोश्रीवर चर्चा व्हायची आणि वादावर पडदा पडायचा. म्हणजेच मनोहर जोशी यांना मिळालेल्या चार वर्षांच्या काळात ही स्थिती कायम राहिली होती. याच काळात रमेश किणी मृत्यू प्रकरण, अण्णा हजारे यांचे आंदोलन, मंत्री शशिकांत सुतार यांना राजीनामा द्यावं लागणं, नैसर्गिक संकटं अशा अनेक वादळांचा मनोहर जोशी यांना सामोरे जावे लागले होते. जानेवारीच्या 1999च्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांनी बहिष्कार टाकला होता.
या सगळ्या धामधूमीत पुण्यातील एका भूखंडाचं प्रकरण न्यायालयासमोर आलं. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेला आता निर्णायक वळण मिळालं होतं. मनोहर जोशी यांना आधी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा देऊनच मला भेटायला या, असा निरोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवला आणि मुख्यमंत्री बदलण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोहर जोशी यांच्यानंतर शिवसेनेचे नारायण राणे युती सरकारचे दुसरे मुख्यमंत्री झाले. नारायण राणे यांनी आपल्या 'नो होल्ड्स बार्ड' या पुस्तकात मनोहर जोशी यांच्या राजीनाम्याआधीच्या काळाचं वर्णन केलं आहे.
'मनोहर जोशी स्वतःला वेगळं सत्ताकेंद्र मानत आहेत' अशी भावना साहेबांच्या मनात निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात आलं असं राणे लिहितात. '1995-97या काळात साहेबांनी जोशींच्या नेतृत्वातील सरकारमधील गरज नसलेल्या लालफीतशाहीवर सामनातून टीका केली होती.
1998 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागा 33 वरून 10 वर आल्यावर युतीचे सरकार टिकण्यासाठी जोशी यांना पदावरून काढणे गरजेचे असल्याचं त्यांना वाटू लागलं', असं राणे यांनी लिहिलं आहे. राणे पुस्तकात सांगतात, "एका रात्री बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला मातोश्रीवर बोलावून घेतले. तेथे उद्धवजीही उपस्थित होते. तेव्हा साहेब स्पष्टपणे म्हणाले, जर जोशीला काढून तुला मुख्यमंत्री बनवला तर तू सरकार चालवणार का? मी म्हणालो, साहेब फक्त चालवणार नाही, दौडवणार.
राणे पुढं लिहितात, दुसऱ्या दिवशीही साहेबांनी हाच प्रश्न विचारला. तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्ही नेहमी जोशी यांच्या जागी मला घेण्याचं बोलता, पण कधीही शेवटचा निर्णय घेत नाही असं का? तेव्हा बाळासाहेब यांनी आपले सचिव आशिष कुलकर्णी यांना बोलावून पत्राचा मजकूर सांगितला. आणि बाळासाहेब यांनी लिहिलेल्या एका पत्रावर जोशी यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले.
बाळासाहेबांच्या निधनानंतर एका दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांना व्यासपीठ सोडू जावं लागलं होतं. याबद्दल एका कार्यक्रमात जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात त्यांनी आपलं मुख्यमंत्रिपद गेलं तेव्हा काय वाटलं होतं, हेसुद्धा सांगितलं होतं. ते म्हणाले होते,"1999 मध्ये एका गैरसमजातून मुख्यमंत्रिपद गेले.
माझ्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तत्काळ राजीनामा दिला. 1995 मध्ये मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केले?
बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाली. उद्धव यांचेही माझ्यावर प्रेम आहे. तथापि, वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो तसेच कम्युनिकेशन गॅपही असू शकते. त्यामुळेच दसरा मेळाव्यातही गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सारे काही माफ करू शकलो."
बाळासाहेब आणि आता जोशीसुद्धा या जगात नाहीत. पण, मातोश्री आणि वर्षा अशी कसरत करताना जोशी यांनी चार वर्षे मुख्यमंत्रिपदाचा जो काही कार्यकाळ सांभाळला ते खूप कठीण काम होते. शिवसेना, प्रशासन आणि मुख्यमंत्रिपद अशी तिहेरी कसरत होती ती…!
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.