Raj thackeray Uddhav thackeray Sarkarnama
देश

Thackeray Brothers Alliance : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना दिल्लीतून महत्वाचा निरोप; राज ठाकरेंबाबत 10 दिवसांत होणार निर्णय?

Thackeray Brothers Congress alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना चालना देत ठाकरे बंधूंच्या काँग्रेससोबतच्या निर्णयाची तारीख ठरली आहे. पंगा होणार की हातमिळवणी? सविस्तर वाचा.

Rashmi Mane

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली मोठ्या वेगाने वाढताना दिसत आहेत. विशेषत: मुंबईतील राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत चर्चा चांगलीच तापली आहे. मात्र, मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा कडाडून विरोध आहे. अशातच आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आता एक मोठी घडामोड समोर आली आहे.

दिग्विजय सिंह हे दिल्लीतील रामलीला मैदानावर 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या महारॅलीसाठी उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यासाठी मुंबईत आले होते. या रॅलीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. मतदार यादीतील गैरव्यवहार, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कथित वोट चोरी या मुद्द्यांवर या रॅलीतून केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे दिल्ली दौरा करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप या युतीची औपचारिक घोषणा झालेली नसली तरी दोन्ही पक्षांतील संवादाची चर्चा जोरात आहे. त्यातच काँग्रेसने मनसेविरोधात कठोर भूमिका घेतली असून महाविकास आघाडीत तणाव वाढल्याचे चित्र आहे. काँग्रेसने ‘एकला चलो’ हा सूर लावत मनसेसोबत कोणत्याही प्रकारची जुळवाजुळव नको, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आघाडीतील पक्षांमधील आगामी युतीचे गणित अधिकच क्लिष्ट झालं आहे.

या घडामोडींच्या दरम्यान आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आले पण उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या महारॅलीत जाणार का? आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युतीबाबतचा तिढा सुटणार का? या भूमिकेमुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या रॅलीची वेळ देखील महत्त्वाची मानली जाते कारण सध्या दिल्लीमध्ये संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशा वेळी विरोधकांची मोठी रॅली होणार असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा आरोप आहे की अनेक राज्यांत मतदार यादीत सातत्याने गोंधळ होत आहे. कुठे मतदारांची नावे गायब होत आहेत तर कुठे चुकीची किंवा अस्तित्वात नसलेली नावे समाविष्ट केली जात आहेत. काँग्रेसच्या मते, हा प्रकार लोकशाही प्रक्रियेवर मोठा आघात आहे आणि याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे.

रामलीला मैदानावरील रॅलीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही सहभागी होणार आहेत. काँग्रेसच्या मते, ही रॅली फक्त राजकीय सभा नसून मतदान प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शी ठेवण्यासाठी सुरू केलेल्या मोठ्या मोहिमेचा भाग आहे.

या मोहिमेअंतर्गत काँग्रेसने देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. नागरिकांकडून जमा झालेल्या स्वाक्षऱ्या व संबंधित कागदपत्रे रॅलीत प्रदर्शित केली जाणार आहेत आणि त्यानंतर ती राष्ट्रपतींकडे पाठवली जातील. तसेच मतदार यादीतील गडबडींची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदार सूची अधिक पारदर्शी आणि अचूक राहावी, यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर काँग्रेसचा आग्रह आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT