Draupadi Murmu, Narendra Modi News
Draupadi Murmu, Narendra Modi News sarkarnama
देश

भाजपचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरला; द्रौपती मुर्मू यांच्या नावाची घोषणा

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर जेपी नड्डा (JP Nadda) यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा केली. (Presidential Election Latest Marathi News)

नड्डा यांनी सांगितले की, संसदीय मंडळाच्या बैठकीत सुमारे 20 नावांवर चर्चा झाली. त्यामध्ये आदिवासी महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून सिन्हा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 29 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

नड्डा यांच्यासह अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी आज सकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीपूर्वी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली होती. यानंतर एनडीए त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार बनवू शकते, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र तसे झाले नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या संख्याबळाच्या आधारावर भक्कम स्थितीत असून, बीजेडी किंवा आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेससारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा विजय सोपा होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT