नवी दिल्ली : राज्यसभेत (Rajya Sabha) अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Budget Session) अखेरही आज (ता.७) गदारोळातच झाली. विरोधी पक्षनेत्यांवर भाजप (BJP) नेतृत्वाने केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावल्याचा मुद्दा इतका तापला की विरोधी पक्षीय सदस्यांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना अधिवेशनाच्या अखेरीस होणारी समारोपाची टिप्पणीही करता आली नाही. अध्यक्षांचे भाषण न होताच 'वंदे मातरम' ने अधिवेशनाचा समारोप करण्याची वेळ राज्यसभेतील कित्येक दशकांतील हे पहिलेच अधिवेशन ठरल्याचे सांगितले जाते.
नायडू यांचा राज्यसभाध्यक्ष म्हणून कार्यकाल येत्या ऑगस्टमध्ये संपत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रस्तावित आहे. ३१ जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली होती. दोन टप्प्यांत हे अधिवेशन झाले. मात्र, आज एक दिवस आधीच अधिवेशनाचे सूप वाजले.
नायडू या प्रकाराने अतिशय व्यथित झाल्याचे दिसत होते. बैठक संपल्यावर त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांना व खासदारांना सांगितले, ‘सभागृहात शांतता राखण्यासाठी मी माझ्या परीने सारे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. असे व्यथित चेहऱ्यांने सांगितल्याचे एका मंत्र्यांनी सांगितले. आज कामकजाच्या सुरवातीलाच शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (Ed) आपल्यावरील कारवाईचा निषेध केला. दुसरीकडे महागाई मुद्यावर सभागृहात चर्चा करावी, अशा नोटीस कॉंग्रेस (congress) व विरोधकांनी दिल्या होत्या. नायडू यांनी तो फेटाळला व शून्य प्रहराचे कामकाज पुकारले. मात्र, तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी गोंधळात बोलण्यास नकार दिला.
काही मिनिटांत सभागृहात गदारोळ सुरू झाला. वेलमध्ये आलेल्यांची नावे उद्याच्या इतिवृत्तात म्हणजे बुलेटीनमध्ये छापा, असा निर्देश नायडू यांनी दिला व माध्यमांनी या गदारोळाचे वृत्तांकन करू नये असेही सांगितले. गदारोळ थांबला नाही तेव्हा ते म्हणाले की तुम्ही विरोधाच्या साऱ्या मर्यादा (लाईन आॅफ कंट्रोल) ओलांडत आहात. असा सारा त्यांनी दिला तरी गोंधळ थांबला नाही. नायडू म्हणाले, की अधिवेशनाच्या आखरीस आपल्याला समारोपाचे बाषणही करता येत नाही, हे अत्यंत दुःखद आहे. हे वर्तन लोकशाहीसाठी योग्य नाही. तरीही गोंधळ चालूच राहिल्यावर नायडू यांनी, कामकाजाची आकडेवारी सभापटलावर ठेवून अदिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा केली.
दरम्यान, आजच्या बैठकीपूर्वी नायडू यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. सूत्रांनी सांगितले की आपले अखेरचे पूर्ण संसदीय अधिवेशन असताना किमान त्याचा समारोप शांततेत व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, ईडीच्या कारवाईमुळे राऊत व कॉंग्रेस नेत्यांच्या भावना तप्त होत्या. परिणामी राज्यसभेतील अर्थसंकल्पी अधिवेशनाची अखेरही गोंदळानेच झाल्याचे अभूतपूर्व दृश्य देशाने पाहिले.
असे झाले कामकाज -
लोकसभा : एकूण बैठका - २७
कामकाज उत्पादकता- १२९ टक्के
विधेयके मंजूर - १३
एकूण कामकाज- ११७ तास ५० मिनीटे
तारांकित प्रश्नांना मंत्र्यांकडून उत्तरे - १८२
राज्यसभा : एकूण बैठका- २७
कामकाज उत्पादकता- ९९. ८० टक्के
विधेयके मंजूर- ११
एकूण कामकाज- १२७ तास ४४ मिनीटे
गोंधळामुळे वाया गेलेल तास-९ तास १६ मिनीटे
तारांकित प्रश्नांना मंत्र्यांकडून उत्तरे -१५३
शून्य प्रहरात मांडलेले मुद्दे - २४८
विशेषोल्लेख -१६८
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.