Rahul Gandhi News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भाने बोलताना मोदी समाजाविषयी चुकीची भाषा वापरल्यामुळे एका फौजदारी खटल्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. गुजरातमधील सूरत सत्र न्यायालयाने हा निकाल गुरूवारी दिला होता. त्यावर तातडीने कारवाई करत अवघ्या २४ तासात लोकसभा सचिवालयाने गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.
अर्थात लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील तरतुदीनुसार गुरूवारी ज्याक्षणी सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी धरत दोन वर्षांची शिक्षा सुनावली त्याक्षणी गांधींची खासदारकी रद्द झाली होती. त्यावर लोकसभा सचिवालयाने केवळ तांत्रिकता पूर्ण केल्याचे कायद्याचे अभ्यासक सांगत आहेत. २०१९ साली कर्नाटकमध्ये बोलताना गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भाने मोदी समाजाबद्दल चुकीची भाषा वापरल्याचा आरोप करत त्यांच्यावर सूरत येथे खटला दाखल केला होता.
लक्षद्विपचे राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) खासदार महमंद फैजल यांच्या खासदारकी काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे रद्द झाली होती. एका फौजदारी खटल्यात फैजल यांना सहा वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतरदेखील लोकसभा सचिवालयाने फैजल यांची खासदारकी रद्द केली होती.त्यानंतर निवडणूक आयोगाने फैजल यांच्या खासदारकीच्या जागेवर पोटनिवडणूकदेखील जाहीर केली होती. मात्र, फैजल यांनी त्यांना झालेल्या शिक्षेच्याविरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने फैजल यांना झालेली शिक्षा रद्द केली नाही. मात्र, त्यांच्या दोषसिद्धीला स्थगिती स्थगिती दिल्याने त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. अगदी काही महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. याचपद्धतीने राहुल गांधी यांनादेखील खासदारकी पुन्हा बहाल होऊ शकते, असे कायद्याच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात निकाल देताना त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिली व शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. शिवाय त्यांना दाद मागण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. मात्र, त्यांचा या खटल्यात दोष सिद्ध झाल्याने गांधी यांना दोषी धरण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या दोषसिद्धीला स्थगिती दिलेली नाही. केवळ या एका कारणामुळे त्यांची खासदारकी (MP) तातडीने रद्द झाली आहे. न्यायालयाने दोषसिद्धीला स्थगिती दिली असती तर त्यांची खासदारकी अबाधीत राहिली असती तसेच त्यांना पुढील न्यायालयीन लढाई लढायला पुरेसा वेळ मिळाला असता.
लक्षद्विपचे खासदार महमंद फैजल (Mohammed Faizal) यांच्या खटल्यात नेमके याचप्रमाणे न्यायालयीन प्रक्रिया झाली आहे. खालच्या न्यायालयाच्या विरोधात फैजल यांनी केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली.दाद मागताना दोषसिद्धीला स्थगिती मिळावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती. न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली त्यामुळे त्यांची रद्द झालेली खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. फैजल यांच्या खटल्याच्या निकालानंतर त्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, न्यायालयाच्या निकालाने सारी प्रक्रिया रद्द करून फैजल यांना पुन्हा खासदारकी मिळाल्याचे अगदी ताजे उदहारण आहे. त्यामुळे अगदी याच पद्धतीने राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल होऊ शकते, असे कायद्याच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.