Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याची अशी आहेत नेमकी कारणं

Congress News : कारवाईनंतर देशभरातील काँग्रेस आक्रमक

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandhi's Disqualification As MP : सर्व चोरांची नावे मोदी का असतात, हे विधान केल्याने सूरत सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुरुवारी (ता. २३) दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेला २४ तास पूर्ण होत नाही तोच लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली.

राहुल गांधींसह देशातील काँग्रेसला या निर्णयांमुळे मोठा धक्का बसला आहे. या निर्णयांविरोधात कालपासून देशभरातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. आजच्या खासदारकी रद्यच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी देशात सुडाचे राजकारण होत असल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, कर्नाटकमधील (Karnataka) कोलार येथे केलेले वक्तव्य राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भोवल्याची चर्चा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी कर्नाटकातील कोलार येथे रॅलीत गेले होते. रॅलीदरम्यान राहुल यांनी मोदी सरकारवर भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करीत जोरदार टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी असे राहुल गांधी यांनी भाषणात म्हटले होते. ते म्हणाले होते, "सर्व चोरांना मोदी हे आडनाव का असते? मग ते ललित मोदी असोत की नीरव मोदी किंवा नरेंद्र मोदी."

राहुल एवढ्यावरच थांबले नव्हते. पुढे ते म्हणाले की, "देशात शोध घेतला तर नव्याने आणखी नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सापडतील." तत्पूर्वी, आपल्या भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना घेरले आणि म्हणाले, "चौकीदार चोर आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, ललित मोदी, अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) ही चोरांची टीम आहे. या लोकांमध्ये जनतेचा पैसा फिरत राहतो."

कर्नाटकातील कोलार येथील सभेतील, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय? या विधानामुळे राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. सूरत पश्चिमचे आमदार पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांनी हा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींविरुद्ध आयपीसी कलम ४९९ आणि ५०० (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्याच्या सुनावणीसाठी आतापर्यंत राहुल गांधींनी न्यायालयात तीनवेळा उपस्थिती लावली. या खटल्याच्या शेवटच्या म्हणजे ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सुनावणीत राहुल गांधींनी मी निर्दोष असल्याचे सांगितले होते. त्यावेळी पूर्णेश मोदींनी निवडणूक सभेत गांधींनी आमच्या आणि समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच आम्ही हे प्रकरण न्यायालयात आणले. या प्रकरणी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचेही ते म्हणाले होते.

२०१३ मध्ये सुरत पश्चिम येथील भाजपचे आमदार किशोर भाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. किशोर भाईंच्या निधनानंतर येथून भाजपने पोटनिवडणुकीत पूर्णेश मोदी यांना तिकीट दिले आणि निवडणूक जिंकून गुजरातच्या तेराव्या विधानसभेत भाजपकडून आमदार झाले. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा पूर्णेश मोदींना तिकीट दिले आणि ते पुन्हा एकदा ही जागा जिंकून आमदार झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT