MP Roopa Ganguly
MP Roopa Ganguly Sarkarnama
देश

राज ठाकरेंच्या वक्तव्याचे पडसाद देशभरात; रुपा गांगुलींचीही वादात उडी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशाराही मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यावरून सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) राजकारण तापलं असून त्याची धग आता देशभर पसरू लागली आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजपच्या (BJP) खासदार रुपा गांगुली (Roopa Ganguly) यांनीही वादात उडी घेतली आहे.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर काँग्रेससह (Congress) शिवसेना (Shiv sena) व राष्ट्रवादीनेही (NCP) जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज यांच्यावर शरसंधान साधत राज्यातील वातावरण पेटेल, अशाप्रकारे बोलू नका, असं आवाहन केलं आहे. हे केवळ चार-दहा दिवसांचं नाटक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. इतर नेत्यांकडून ठाकरेंचा समाचार घेण्यात आला आहे. भाजपने लिहून दिलेल्या स्क्रीटनुसार हे भाषण असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.

राज यांच्या वक्तव्यावरून आता देशभरात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गांगुली यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना राज यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, धर्मांची निर्मिती झाली त्यावेळी लाऊडस्पीकर अस्तित्वात होते का? आपल्या धर्माच्या प्रचार-प्रसाराचा त्रास इतरांना होता कामा नये. दिवसभरात पाच ते दहावेळा लाऊडस्पीकर लावण्याची प्रथा आता बंद व्हायला हवी, अशी मागणी गांगुली यांनी केली आहे.

दरम्यान, राज यांच्या वक्तव्यानंतर रविवारी मनसेच्या चांदिवली विधानसभा मतदार संघांचे महेंद्र भानुशाली यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर भोंगे लावत हनुमान चालिसा लावला. चिरागनगर पोलिसांनी (Police) मनसे कार्यकर्त्यांना अगोदर समज दिली. पण पोलिसांनी समज देऊनही भोंगे न उतरवल्यामुळे अखेर पोलिसांनीच मनसेच्या कार्यालयाबाहेर लावलेले भोंगे उतरवले आणि महेंद्र भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरेंनी शनिवारी गुडीपाडवा मेळाव्यात राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला होता. पंतप्रधानांना विनंती करताना ते म्हणाले होते की, तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकता आहात ना. पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल. प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे काढले नाही तर मस्जिदींवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशाराही राज यांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT