Mahua Moitra, CM Ypgi Adityanath Sarkarnama
देश

IIT-BHU Gangrape Case : ठोक दीजिए सर ! गँगरेप प्रकरणामुळे भाजप बॅकफूटवर, मोईत्रांचे थेट योगींनाच चॅलेंज...

Rajanand More

Uttar Pradesh News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील गँगरेप प्रकरणामुळे भाजप बॅकफूटवर गेले आहे. वाराणसीमधील काशी हिंदू विद्यापीठातील गँगरेप प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून ते भाजपच्या आयटी सेलशी संबंधित असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यांचे भाजपनेत्यांसोबतचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) पार्श्वभूमीवर हे प्रकरण तापल्याने भाजपच्या (BJP) अडचणी वाढल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर निशाणा साधला आहे. आरोपींचे त्यांच्यासोबतचे फोटो मोईत्रा यांनी सोशल मीडियात (Social Media) पोस्ट करून त्यांच्या घरांवर बुलडोझर कधी चालवणार, असा सवाल केला आहे.

मोईत्रा यांनी सोशल मीडियात म्हटले आहे की, ‘ठोक दीजिए सर. इस बार बुलडोझर चलाने में इतनी देरी क्यों?’ योगी सरकारकडून विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवला जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांकडून बुलडोझरबद्दल सरकारवर टीका अनेकदा केली जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महिन्याभरापूर्वी गँगरेपची घटना

काशी हिंदू विद्यापीठाच्या आवारात १ नोव्हेंबर रोजी एका तरुणीवर गँगरेपची घटना घडली. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला होता. पण तब्बल दोन महिने आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. अखेर सोमवारी तीन आरोपींना अटक करण्यात आली. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि अभिषेक चौहान अशी त्यांची नावे आहेत.

अटक केलेले तिघेही आरोपी भाजपच्या वाराणसी आयटी सेलचे पदाधिकारी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यांच्या सोशल मीडियातील प्रोफाईलवरही भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचेही फोटो असून ते व्हायरल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेससह सर्वच विरोध पक्षांकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे.

काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा नेता डिसूझा यांनी भाजप भारतीय जनता पार्टी नसून बलात्काली जनता पार्टी असल्याची टीका केली आहे. हे तिघे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपचा प्रचार करीत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. त्या आरोपींचा भाजपशी संबंध नसून आम्ही गुन्हेगारांना पक्षात पद देत नाही, असे भाजप मध्य प्रदेशचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT