मंगेश वैशंपायन
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्याकडून चीनच्या घुसखोरीवरुन सत्ताधारी मोदी सरकारवर वारंवार निशाणा साधत असतात. तवांगमधील भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीसंदर्भातही त्यांनी सरकारवर टीका केली होती. चीन आमच्या विरोधात युद्धाच्या तयारीत आहे. पण आमचे सरकार हे मान्य करायला तयार नाही, ते सत्य लपवत आहे असा हल्लाबोल गांधी यांनी केला आहे.
तसेच चीनने भारताच्या 2000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केला आहे, 20 भारतीय सैनिकांना मारले आहे आणि अरुणाचल प्रदेशात भारतीय लष्कराच्या जवानांना चीन सातत्याने मारहाण करत आहे असा आरोपही गांधी यांनी केला होता. त्याला आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
तवांग भागातील चीनच्या घुसखोरी प्रकरणी मोदी सरकार व विरोधकांमध्ये चांगलीच खंडाजंगी पाहायला मिळत आहे. चीनच्या घुसखोरीवरुन काँग्रेसने केलेली टीका मोदी सरकारला चांगलीच झोंबली आहे. याच टीकेला आता भाजपने राहुल गांधी यांना फितूर-गद्दार जयचंद याची उपमा देत हल्लाबोल केला आहे. मात्र, घटना घडून १० दिवस उलटले तरी संसदेत या प्रकरणी चर्चा करण्यास सरकारकडून होणारी टाळाटाळ हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
भाजपने राहुल गांधींवर भारतीय लष्कराचे मनोधैर्य तोडल्याचा आरोप केला आहे. भाजप नेते व खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले, कॉंग्रेस नेतृत्वाने उरी आणि बालाकोट हल्ल्यांनंतरही लष्कराच्या शौर्याचा पुरावा मागितला होता. आता तरी हे खोटेनाटे पसरवणे आणि देशाचे मनोबल तोडणे बंद करा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आजचा भारत अत्यंत मजबूत असून सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे.
भाजप पक्षप्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, राहुल गांधींना समजावे लागेल की हा १९६२ चा भारत नाही. भारताची एक इंचही जमीन कोणाच्या ताब्यात नाही आणि ती घेण्याचे धाडस कोणाचेही नाही. आमच्याकडे जगातील सर्वात धाडसी सैन्य आहे, आम्ही मुत्सद्दीपणे सक्षम आहोत. लष्करामुळे जेव्हा जेव्हा देशवासीयांची छाती ५६ इंच होते, तेव्हा काँग्रेस आणि राहुल गांधींची छाती ६ इंचांपर्यंत कुंचन पावते ! असे काय कारण आहे असा सवाल त्यांनी केला.
तसेच एक भारतीय म्हणून मला व माझ्या पक्षाला भारताच्या सैन्याचा अभिमान आहे, जेव्हा आमचे शूर सैनिक सीमेवर चिनी सैन्याला मारहाण करून पळवू लावत आहेत. त्यावेळी आमच्या सेनेचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम 'जयचंद' राहुल गांधी करताहेत अशी बोचरी टीका देखील भाटिया यांनी गांधींवर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.