BJP

 

Sarkarnama

देश

भाजपचा दे धक्का! काँग्रेसच्या दोन आमदारांसह विरोधकांचे माजी आमदार अन् माजी खासदार फोडले

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर भाजपने ((BJP) फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये (Punjab) भाजपने ((BJP) फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. भाजपने आता काँग्रेससह (Congress) अकाली दलाला (Akali Dal) धक्का दिला आहे. दोन विद्यमान आमदारांसह एक माजी आमदार आणि एका माजी खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात केवळ तीनच आमदार असलेल्या भाजपची ताकद यामुळे वाढली आहे.

काँग्रेसचे आमदार फतेहसिंग बाजवा, काँग्रेसचे आमदार बलविंदरसिंग लड्डी, अकाली दलाचे माजी आमदार गुरतेजसिंग गुढियानी, युनायटेड अकाली दलाचे माजी खासदार राजदेवसिंग खालसा आणि पंजाब-हरयाना उच्च न्यायालयातील वकील मधुमित यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. फतेहसिंग बाजवा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांचे बंधू आहेत. भाजपचे पंजाब प्रभारी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेससह आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दलातील नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामध्ये चार प्रसिध्द गायकांचाही समावेश आहे. त्यातील चार जणांचा आता भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder singh) स्वतंत्र चूल मांडत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यांची आघाडी पंजाबमध्ये काँग्रेस व अकाली दलाला टक्कर देणार आहे.

अमरिंदरसिंग यांचे अनेक समर्थक काही माजी मंत्री व विद्यमान आमदारही भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमरिंदरसिंग काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवडाभरात अनेक नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. अनेक जण भाजपमध्ये येणार असल्याने टप्प्याटप्याने हे प्रवेश होणार आहेत. दहशतवादी कारवाया आणि अमली पदार्थांची समस्या आदी मुद्द्यांवरून पंजाबमध्ये रोष आहे. त्यामुळे अनेक नेते आता भाजपकडे आशेने पाहत आहेत.

अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजपविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पण आता कायदे मागे घेण्यात आल्याने आणि अमरिंदरसिंग भाजपसोबत गेल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसमध्ये नवज्योतसिंग सिध्दू यांच्याविषयी काही गट नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी निवडणूक काँग्रेससाठी कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने 117 पैकी 77 जागा मिळवत अकाली दल व भाजप आघाडीकडून सत्ता काबीज केली होती. हे दोन पक्ष सलग दहा वर्षे सत्तेत होते. या निवडणुकीत आप 20 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर अकाली दलाला 15 आणि भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT