नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरूध्द (Russia-Ukraine Crisis) युध्द पुकारले असून जोरदार हल्लाही सुरू केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला हादरा बदला आहे. अमेरिकेसह अन्य देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे, पण रशियाने (Russia) जगातील इतर देशांनी यात ढवळाढवळ करु नये, असा गर्भित इशारा दिला आहे. असे असतानाही युक्रेनच्या (Ukraine) दूताने थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे मध्यस्थीची मागणी केली आहे.
युक्रेनचे भारतातील दूत इगोर पोलिखा यांनी आता थेट रशियासोबतच्या संघर्षात भारताच्या मध्यस्थीची मागणी केली आहे. मोदी आणि व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे संबंध चांगले असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे. ते म्हणाले की, मोदी हे जगातील सामर्थ्यवान आणि सन्माननीय नेते आहेत. भारताचे रशियासोबत अतिशय चांगले सामरिक संबंध आहेत. मोदींजींनी पुतीन यांच्याशी संवाद साधल्यास ते नक्कीच प्रतिसाद देतील, अशी आम्हाला आहे. केवळ युक्रेनच्या नागरिकांसाठी नव्हे तर तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारताचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. आम्हाला केवळ राजशिष्टाचाराचे निवेदन नको. आम्हाला सगळ्या जगाकडून पाठिंबा हवा आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे. शस्त्र टाका अन्यथा रक्तपात अटळ आहे, असा इशाराही रशियाने या वेळी दिला आहे. तसेच, रशियाच्या युक्रेन ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणार्यांना आपण तात्काळ उत्तर देऊ, असा थेट इशारा पुतिन यांनी दिला आहे. सोबतच रशियाने केलेली कारवाई ही स्वसंरक्षणासाठी असल्याचे सांगत त्यांनी कारवाईचे समर्थन केले आहे.
पुतीन यांनी भाषणादरम्यान जगातील इतर देशांनाही सावधगिरीचा इशारा दिला आहे. रशियाच्या कारवाईत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न केल्यास त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आमच्या नागरिकांना किंवा देशाला हानी पोचवण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या इतिहासात कधीही अनुभवले नसेल एवढे भयानक परिणाम होतील, असं पुतीन यांनी म्हटले आहे. पुतीन यांच्या या भूमिकेमुळे तिसऱ्या महायुध्दाची (World War III) चाहूल लागल्याची भीती सोशल मीडियातून व्यक्त केली जात आहे.
पुतीन यांच्या भाषणाच्या काही मिनिटांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी कोणत्याही प्रकारची कारवाई ही मोठ्या प्रमाणावर मानवी विनाशाला कारणीभूत ठरू शकते, असा इशारा दिला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पुतीन यांनी निवडेल्या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी होणार असल्याची भितीही यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. यातील प्रत्येक प्राणहानीसाठी केवळ रशियाच जबाबदार असेल. मात्र अमेरिका आणि सहकारी निर्णायकपणे रशियाला प्रत्युत्तर देतील, असे त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण जगातील नागरिक युक्रेनच्या नागरिकांसोबत आहेत, असा आशावाद त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.