Lok Sabha News : लोकसभेत बुधवारी विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला दुसऱ्या दिवशी राहुल गांधींच्या भाषणाने सुरुवात झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अविश्वास प्रस्तावावर उत्तर दिले. शाह यांनी विरोधकांवर आणि विशेषत, काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारच्या सर्व कामगिरीची मोजदाद करत अमित शाह म्हणाले, विरोधकांचा मोदी सरकारवर विश्वास नाही, जनतेवरही नाही. जनता फक्त मोदी सरकारच्या पाठीशी आहे. यावेळी शाह यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला.
मणिपूर हिंसेबाबत अविश्वास प्रस्तावाबाबत बोलताना शाह म्हणाले, हिंसेचे कोणीही समर्थन करत नाही. घडलेली घटना चुकीची आहे. त्यावर राजकारण करणे हे त्याहूनही लाजिरवाणे आहे. सरकारला मणिपूरवर चर्चा नको आहे, असा भ्रम पसरवला गेला आहे. मी सभापतींना पत्र लिहिले होते. विरोधकांना चर्चा नको होती. गृहमंत्र्यांनी अजिबात बोलू नये असे तुम्हाला वाटते.
कलम ३७० ही नेहरूंची चूक होती, जी मोदींनी हटवली. ईशान्येकडील राज्यांबद्दल बोलताना शाह (Amit Shah) म्हणाले, आता मणिपूरमध्ये हिंसक घटनांमध्ये घट झाली आहे. देशात असे पंतप्रधान झाले आहेत ज्यांनी १५ ते १८ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही ईशान्येला भेट दिली नाही, तरीही विरोधी पक्षांना त्यांचा अभिमान आहे, तर पंतप्रधान मोदी ९ वर्षात ५० पेक्षा जास्त वेळा ईशान्येला गेले आहेत. सर्वात जास्त दंगली, हत्याकांड कुणाच्या काळात झाले असेल तर ते काँग्रेसच्या काळात झाले आहेत. पंतप्रधान पंडित जावहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळात झाल्या, असल्याचा आरोप शाह यांनी केला.
या सभागृहात १३ वेळा राजकारणात 'लॉंचिंग' झालेला नेता आहे. प्रत्येक वेळी त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. अशा शब्दांत शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. लोकसभेत आतापर्यंत २७ अविश्वास प्रस्ताव आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळावर कोणाचाही अविश्वास नाही. त्याचा उद्देश फक्त जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आहे. दोन-तृतीयांश बहुमताने दोनदा 'एनडी'ए निवडून आला. सरकार अल्पमतात असण्याचा काही अर्थ नाही."
'यूपीए' सरकारच्या काळात (२००४ ते १४) दहशतवादी सीमेपलीकडून घुसायचे आणि सैनिकांचा शिरच्छेद करून घेऊन जायचे. कोणीही उत्तर देत नव्हते. आमच्या सरकारमध्ये दोनदा पाकिस्तानने धाडस केले. दोन्ही वेळा (सर्जिकल आणि एअर स्ट्राइक) पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला.
काँग्रेसने (Congress) 'गरीबी हटाओ'चा नारा दिला. मात्र, गरिबी तशीच राहिली. पण मोदींना समस्या समजली कारण त्यांनी गरिबी पाहिली होती. काँग्रेस कर्जमाफीचे 'लॉलीपॉप' देत असे, तर भाजपचा (BJP) अजेंडा शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असा आहे. काँग्रेसने सर्व काही सांगितले पण काही केले नाही. भाजपने ते केले. यासह काश्मीरच्या आतून दोन ध्वज, दोन संविधाने संपुष्टात आली आणि ते भारताशी पूर्णपणे जोडले गेले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.