Amit Shah Meeting In Rajasthan : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जयपूर दौऱ्यामुळे राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बुधवारी रात्री दोन वाजेपर्यंत दोन्ही नेत्यांनी जयपूरमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती आखली.
भाजपच्या (BJP) उच्चस्तरीय बैठकीत अमित शाह (Amit Shah) यांनी खासदार दिया कुमारी यांना सर्व बड्या नेत्यांसमोर स्वतंत्रपणे बोलावून चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. खासदार दिया कुमारी यांनी जयपूरच्या हवामहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर वसुंधरा राजे यांनाही वेगळे बोलावून त्यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुकीत वसुंधरा राजे यांच्या जागी दिया कुमारी यांना उभे करू शकते, अशी चर्चा आहे.
दिया कुमारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जयपूरमधील सभेत मोठी जबाबदारी मिळाली होती. या घटनेची राजस्थानमध्ये एकच चर्चा झाली होती. त्यामुळे भाजप राजस्थानमध्ये काही नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. भाजप विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या यादीत दिया कुमारी यांचेही नाव असल्याचे सूत्रांकडून समजते.
त्यांच्याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, खासदार रामचरण बोहरा, चुरूचे खासदार राहुल कासवा, टोंक सवाई माधोपूरचे खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया, जयपूर ग्रामीणचे खासदार कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासह एक डझनहून अधिक खासदारांना विधानसभेचे तिकीट देण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.