Tamilisai Soundararajan, Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah : शाहांनी शपथविधीच्या स्टेजवरच महिला नेत्याला फटकारलं; भाजप नेत्यांमध्ये वादाचा भडका

Rajanand More

Tamil Nadu BJP : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यात भाजपमधील अंतर्गत वादाचे नाट्य पाहायला मिळाले. या सोहळ्यातील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली असून त्यावरून राजकारण तापलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्टेजवर तेलंगणाचे माजी राज्यपाल व भाजप नेत्या तमिलीसाई सुंदरराजन यांच्यावर संतापल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तमिलिसाई स्टेजवर आल्यानंतर सर्व नेत्यांना अभिवादन करत असताना शाहांनी त्यांना थांबवले आणि बोलू लागले.

शाह तमिलीसाई यांच्याशी संतापून बोलत असल्याचे दिसत असून त्यावरून सोशल मीडियात चर्चांना उधाण आले आहे. दोघांमधील गंभीर चर्चेला तमिळनाडूतील अंतर्गत वादाची किनार असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तमिलीसाई आणि प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्यातील वाद समोर आला आहे.

शाह आणि तमिलिसाई यांच्यातील संवादावरून डीएमकेने टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सर्वनन अण्णादुराई यांनी म्हटले आहे की, हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? तमिळनाडूतील एका ज्येष्ठ महिला नेत्याला अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रमात फटकारणे योग्य आहे का? हे सर्वजण पाहतील, याची कल्पना अमित शाह यांना असायला हवी होती.

काय आहे भाजपमधील वाद?

अण्णामलाई हे तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखालीच लोकसभेची निवडणूक लढवली गेली. पण राज्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. तसेच मतांची टक्केवारीही अपेक्षित वाढली नाही. त्यावरून पक्षातील काही नेत्यांनी अण्णामलाई यांच्यावर पराभवाचा ठपका ठेवला आहे.

तमिलीसाई यांनीही एका मुलाखतीत अण्णामलाई यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपने एआयएडीएमकेशी आघाडी केली असती तर 35 जागांवर विजय मिळाला असता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना पद दिली जातात, असे विधान तमिलीसाई यांनी केले होते.

अण्णामलाई यांच्या समर्थकांना हे विधान खटकले आणि त्यांनी तमिलिसाई यांच्याविरोधात सोशल मीडियात मोहिम चालवली आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. याबाबतचा अहवाल राज्याचे प्रभारी पियुष गोयल यांनी मागवला असल्याचे समजते. त्यांनी बुधवारी शपथविधी सोहळ्यात अमित शाह आणि तमिलीसाई यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT