Ratan Tata, Nitin Gadkari
Ratan Tata, Nitin Gadkari Sarkarnama
देश

रतन टाटांना 'संघा'विषयी काय वाटत होतं? गडकरींनीच सांगितला किस्सा

सरकारनामा ब्युरो

पुणे : काँग्रेससह इतर भाजपविरोधी पक्षांकडून सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) लक्ष्य केलं जातं. पण प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या एका प्रश्नानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही काहीसं आश्चर्य वाटलं होतं. गडकरी यांनीच दोघांमधील संवादाचा किस्सा पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितला.

पुण्यातील एका रुग्णालयाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी बोलताना त्यांनी रतन टाटांविषयीची एक आठवण सांगितली. गडकरी हे महाराष्ट्र सरकारमध्ये त्यावेळी मंत्री होते. एका रुग्णालयाच्या उदघाटनासाठी रतन टाटा यांना बोलवायचे होते. त्यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गडकरी यांना टाटांना आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती.

याबाबतचा किस्सा सांगताना गडकरी म्हणाले, ''डॉ. पंढरी यांना घेऊन मी रतन टाटा यांच्याकडे गेलो होतो. रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी त्यांना आपल्याबरोबर यावे, असं त्यांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, 'नितीनजी, मी कधी माझ्या फॅक्टरीचेही उद्घाटन केलेलं नाही. मी कधी गेलो नाही. मला भाषण द्यायलाही येत नाही.' मग मी म्हटलं, 'आपण टाटा कॅन्सर हॉस्पीटलची स्थापना केली आहे. तुमचे रुग्णालय देशातील लाखो लोकांवर उपचार करत आहे. तुमची समाजाप्रतीची सजगता खूप महत्वाची आहे.''

या संवादानंतर गडकरी यांनी टाटांना रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी येण्याचा आग्रह केला. गडकरी म्हणाले, आग्रह केल्यानंतर मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही, असं सांगत मग ते तयार झाले. त्यांनी स्वत: विमान चालवलं. आम्ही औरंगाबादला गेलो. तिथं उतरल्यानंतर त्यांनी मला विचारलं की, 'हे केवळ हिंदूसाठी रुग्णालय आहे का?' 'तुम्हाला असं का वाटलं,' असा मी त्यांना विचारलं. 'हे आरएसएसचं आहे ना,' असं उत्तर टाटांनी दिलं.

त्यावर गडकरी यांनी त्यांना सांगितलं की, असं नाही. हे सर्व समाजांसाठी रुग्णालय आहे. 'आरएसएस'मध्ये असं कधी होत नाही,' असं टाटांना सांगितल्याच्या किस्सा गडकरी यांनी यावेळी सांगितला. आरएसएसमध्ये असा भेदभाव केला जात नाही, असं गडकरींना सांगायचं होतं. यावेळी बोलताना गडकरी यांनी देशात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणकी सुधारण्याची गरज व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT