Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
देश

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचं समर्थन करून गडकरींनीच सांगितलं वाढीचं कारण...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशांत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरांचा भडका उडाला आहे. मागील 5 दिवसांत पेट्रोलच्या दरात 3 रुपये 20 पैशांची वाढ झाली आहे. आगामी काळात इंधन दरवाढीचे आणखी चटके जनतेला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या दरवाढीचे समर्थन केले आहे. याचबरोबर ही दरवाढ होण्याचे कारणही गडकरी यांनी सांगितले आहे. (Petrol Diesel price hike News)

गडकरींनी एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर भाष्य केले. ते म्हणाले की, देशात 80 टक्के खनिज आयात केले जाते. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आम्ही यात काहीही करू शकत नाही. मी 2004 पासून भारताने इंधनाबाबत स्वयंपूर्ण व्हावे, अशी भूमिका मांडत आहे. ऊर्जा निर्मितीचा क्षमता आपण विकसित करायला हवी. भारत हा लवकरच 40 हजार कोटी रुपयांच्या इथेनॉल, मिथेनॉल आणि बायो-इथेनॉलचे उत्पादन घेणारी अर्थव्यवस्था बनेल. यामुळे खनिज तेलाची आयात कमी होण्यास मदत होईल.

सुमारे चार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील पाच दिवसांत चार वेळा प्रतिलिटर 80 पैसे वाढ करण्यात आली आहे. यामुळे पाच दिवसांत पेट्रोल, डिझेलचे दर 3 रुपये 20 पैशांनी महागले आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.81 रुपये झाला असून, डिझेलचा दर 88.87 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 110 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT