UP Election 2027 
देश

UP Election 2027: युपी निवडणुकीची रणधुमाळी! 'संविधान बचाओ, बीजेपी हटाओ'चा थेट नारा देत माजी मंत्र्याचा पक्ष INDIA आघाडीत सामील

UP Election 2027: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केवळ तीनच महिने आता शिल्लक राहिले आहेत.

Amit Ujagare

UP Election 2027: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केवळ तीनच महिने आता शिल्लक राहिले आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक ही देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी महत्वाची निवडणूक असते. यापार्श्वभूमीवर युपीच्या राजकारणात आता मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. त्यातच योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री राहलेल्या एका बड्या नेत्यानं भाजपला झटका दिला आहे. 'संविधान बचाओ, बीजेपी हटाओ' असा स्पष्ट नारा देत या नेत्यानं काँग्रेसप्रणित INDIA आघाडीत सामील होणार असल्याची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशातील अपनी जनता पार्टीचे अध्यक्ष स्वामी प्रसाद मौर्य यांनी नुकतीच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांची १० जनपथ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी INDIA आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. माध्यमांशी बोलताना त्यांनी याची अधिकृत घोषणा केली. भाजपला राज्यातील आणि देशातील सत्तेतून दूर करायचं हे आपलं लक्ष्य आहे. त्यामुळं 'भाजप हटाओ, देश बचाओ' आणि 'संविधान बचाओ, भाजपा हटाओ' असा आमचा नारा असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी ज्या प्रकारे संपूर्ण देशभरात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकं समाजासाठी आवाज उठवत आहेत. आमचाही पक्ष उत्तर प्रदेशात हीच भूमिका राबवत आहे. हा आमच्यातला सामाईक धागा असल्यानं आम्ही आघाडीसोबत जात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य हे ओबीसी समाजातून येतात. त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य या सध्या भाजपच्या खासदार राहिल्या आहेत. तसंच स्वतः स्वामी प्रसाद मौर्य हे २०१६-२०२२ या काळात भाजपत होते. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये त्यांनी श्रम, रोजगार आणि समन्वय मंत्री म्हणून कारभार पाहिला. त्यानंतर २०२२च्या निवडणुकीपूर्वीच ते भाजपतून बाहेर पडल. त्यानंतर २०२२ ते २०२४ या दोन वर्षांच्या काळात ते समाजवादी पार्टीत होते. पण अखिलेश यादव यांच्याशी काही मुद्द्यांवर मतभेद झाल्यानंतर त्यांनी आपल्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी अपनी जनता पार्टी म्हणून नवा पक्ष स्थापन केला, सध्या या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशातील जाती-आधिरात राजकारणातील अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी भाजपा, समाजवादी पार्टीसह सर्वाधिक काळ १९९६ ते २०१६ मयावतींच्या बहुजन समाज पार्टीमध्ये व्यतीत केला आहे. मायावतींचे ते जवळचे सहकारी होते. अनेकदा ते आमदारही झाले, श्रम-रोजगार मंत्री, विरोधीपक्ष नेते आणि बसपाचे प्रदेशअध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. १९८० मध्ये त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली तेव्हा ते लोकदल अर्थात जनता दलाचे सदस्य होते.

स्वामी प्रसाद मौर्य हे उच्चशिक्षित राजकारणी असून इलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी पदवी, एलएलबी तसंच एमएची पदवी प्राप्त केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. सध्या ते वकील, शेतकरी आणि राजकारणी अशा तिहेरी भूमिकेत आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी शिव मौर्य, मुलगा उत्कृष्ट मौर्य आणि मुलगी डॉ. सघमित्रा मौर्य आहेत. या सर्वांना राजकारणाची पार्श्वभूमी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT