लखनौ : रशियाने (Russia) युक्रेनवर हल्ला केल्यानंतर भारतीयांना परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली सुटका करण्याचे आवाहन केले आहे. त्यापैकीच एका व्हिडीओने सरपंच असलेल्या विद्यार्थिनीची पोलखोल झाली आहे. वैशाली यादव (Vaishali Yadav) असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती एका गावची सरपंच आहे. सरपंच असूनही ती युक्रेनमध्ये (Ukraine) शिक्षण घेत असल्याने वाद निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
वैशाली ही उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अरवल क्षेत्रातील पुरसौली गावची सरपंच आहे. युक्रेनमध्ये युध्द सुरू झाल्यानंतर ती तिथून बाहेर पडली असून सध्या रोमानियामध्ये आहे. याबाबतचा व्हिडीओ तिने सोशल मीडियाद्वारे पाठवला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्याबाबतची माहिती समोर आली आहे. वैशाली युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तिचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी काही महिनेच शिल्लक आहेत. वैशाली 2018 मध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेली आहे. (Russia Ukraine War)
2021 च्या पंचायत निवडणुकीवेळी वेशाली गावांत आली होती. तिने ही निवडणूक लढवली आणि निवडूनही आली. गावकऱ्यांनी तिला सरपंचही केलं. वैशालीची आजी दोनवेळा सरपंच होती. त्यामुळे वैशालीनेही गावाला डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवत निवडणूक लढवली. तिच्या वडिलांनी शिक्षणासाठी राजकारणात न येण्याचे सांगत त्याला विरोध केला होता. पण विरोध डावलून तिनं निवडणूक लढवली. मात्र, सरपंच झाल्यानंतर ती पुन्हा युक्रेनला शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेली आहे. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेचे अधिकारी गिरीश चंद्र यांनी ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायतीतील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. वैशाली भारतात आल्यानंतर याबाबत तिचा जबाब घेतला जाणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी वंदना त्रिपाठी यांनी सांगितले. वैशाली युक्रेनमध्ये असताना तिचे गावातील काम वडील सांभाळत आहे. पण बँक खात्यातील व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. गावासाठी येणारा निधी सरपंचांच्या खात्यात जमा होत असतो. याबाबत आता जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आल्याने वैशालीच्या अडचणी वाढल्या आहेत.
वैशालीचे वडील महेंद्र सिंह यांनी मात्र कोणतेही काम नियमाबाहेर केले नसल्याचे म्हटले आहे. सरपंच असल्यानंतर शिक्षण घेता येत नाही, असे नाही. तसेच परदेशात जाण्यासाठीही परवानगी लागत नाही. ग्रामपंचायतीच्या एका बैठकीत उपस्थित राहून ती युक्रेनला गेली. आता परत आल्यानंतर दुसऱ्या बैठकीला उपस्थित राहील. समाजवादी पक्षाची कार्यकर्ती असल्याने खोटी माहिती पसरवली जात आहे. तिने सर्व काम नियमांनूसारच केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.