नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता तिसऱ्या महायुध्दाची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहेत. त्यातच रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबतचे थेट संकेत दिल्याने जगावर युध्दाचे सावट निर्माण झाले आहे. तसेच हे युध्द झाल्यास ते आण्विक युध्द असेल आणि आतापर्यंतचे सर्वाधिक विनाशकारी ठरले, असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी आपली अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याचे आदेश यंत्रणांना काही दिवसांपूर्वीच दिला आहे.(Russia Ukraine War News Updates)
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लावारोव्ह यांनी हे वक्तव्य केल्यानं रशियाच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहे. रशियातील सरकारी वृत्तवाहिनीला लावारोव्ह यांनी बुधवारी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आण्विक युध्दाचे संकेत दिले आहेत. त्यांच्याआडून पुतीन यांनी अमेरिकेसह जगाला संकेत दिल्याचे मानले जात आहे. युक्रेनशी (Ukraine) सुरू केलेल्या युध्दाचा गुरूवारी आठवा दिवस असून रशिया मागे हटण्यास तयार नाही.
अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर विविध निर्बंध लादले आहेत. पण त्यानंतरही पुतीन थेट जगालाच आव्हान देत असल्याने अमेरिकाही सावध पावले टाकू लागली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी रशियाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे म्हटले आहे. कदाचित युक्रेनमध्ये रशियाच्या हाती काहीतरी लागेल, पण यापुढे रशियाच्या पुढे काय वाढून ठेवले आहे, हे त्यांना माहीत नाही, असं बायडन म्हणाले होते. त्यामुळे युक्रेन युध्दानंतर जगात मोठा घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Russia Ukraine War)
पुतीन यांचे कुटुंबीय न्युक्लिअर बंकरमध्ये
रशियन प्राध्यापकाच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. पुतीन यांचे कुटुंबीय सायबेरीयीतील एका सुरक्षित बंकरमध्ये पाठवल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत डेली मेलने वृत्त दिले आहे. मॉस्को स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे माजी प्राध्यापक व्हॅलेरी सोलोव्ही यांनी याबाबत माहिती दिली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, पुतिन यांना आण्विक युध्दाची भीती वाटत आहे. त्यामुळे कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
आधीपासूनच तयार अशलेल्या न्युक्लिअर बंकरमुध्ये कुटुंबीयांना पाठवले आहे. हे बंकर सायबेरियातील अल्ताई पर्वतरांगांमध्ये आहे. या बंकरवर अण्वस्त्रांचा कसलाही परिणाम होणार नाही, अशी त्याची रचना करण्यात आली आहे. आठवड्याच्या शेवटी पुतिन यांनी हे पाऊल उचलले आहे. खरंतर हे बंकर नसून अंटरग्राउंड शहरच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात आल्याचा दावाही प्राध्यापकांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.