Uttar Pradesh News: बिहारनंतर आता सर्वांचं लक्ष पुढच्या वर्षी होत असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. याच उत्तर प्रदेशमधून सर्वात मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच भाजप, काँग्रेस, समाजवादी पार्टी यांच्यासह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी शनिवारी(ता.24) आपल्या डझनभर सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह जवळपास 72 नेत्यांनी पक्ष सोडचिठ्ठी दिली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यात 24 माजी आमदारांचा समावेश आहे.
नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी (Rahul Gandhi), यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर येत आहे. सिद्दीकी यांच्यासह एकाचवेळी 72 नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
एकापाठोपाठ एक धक्के सहन करत असलेला काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात कमबॅक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.अशातच आता सिद्दीकींनी पक्षाचा राजीनामा देत पक्षनेतृत्वाला आव्हान दिलं आहे.
नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना कार्यपध्दतीवर टीका करतानाच कोणत्याही मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेले नाहीत. त्यांनी गेल्या काही काळापासून पक्षाच्या कार्यशैली आणि अंतर्गत परिस्थितीविषयी नाराजी व्यक्त करतानाच अस्वस्थ वाटत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच संघटनेत सिद्दीकी यांना काहीसं दुर्लक्षित करण्यात येत असल्यानं त्यांची नाराजी वाढतच गेल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी आपण जातीयवाद व सांप्रदायिकतेच्या माध्यमातून होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात दाखल झालो होतो अशी भावना व्यक्त केली. मात्र, याचवेळी त्यांनी मला ही लढाई लढता आली नाही, अशी खंत व्यक्त करतानाच राजीनाम्यामागचं कारणही सांगून टाकलं.
तसेच राजीनामा देताना सिद्दीकी यांनी कोणत्याही काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध आपली तक्रार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण ज्या कामासाठी पक्षात सहभागी झालो, ते पूर्ण होत नसल्याची नाराजी दर्शवली आहे. माझ्यासोबत ज्यांनी कुणी राजीनामा दिला आहे, त्या सर्वांशी विचारविनिमय सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.
तसेच भविष्यात ज्या राजकीय पक्षासोबत काम करण्याचा निर्णय होईल, तिथे जनतेच्या लढ्यासाठी नक्कीच प्रयत्न सुरु राहील,अशी ग्वाहीही सिद्दीकी यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.