Yogi Adityanath, Brijbhushan Singh Sarkarnama
देश

Brijbhushan Singh : ...तर उत्तर प्रदेशात भूकंप होईल! भाजप नेत्याचा थेट योगींना इशारा

Rajanand More

Uttar Pradesh : लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आता भाजपमधूनच विरोध वाढू लागला आहे. त्यांच्या सरकारने आणलेल्या नझुल संपत्ती कायद्याला आमदार आणि नेत्यांकडून कडाडून विरोध होत आहे. विधान परिषदेत पक्षाच्या आमदारांनी कायद्याला उघडपणे विरोध केला.

भाजपचे नेते व माजी खासदार बृजभूषण सिंह यांनीही योगी सरकारला थेट इशारा दिला आहे. हा कायदा मंजूर झाला तर उत्तर प्रदेशात भूंकप होईल, असे सिंह यांनी म्हटले आहे. हा कायदा कोणत्या उद्देशाने आणला, हेच मला समजले नसल्याचेही सिंह म्हणाले आहेत.

बृजभूषण सिंह यांनी योगींना सतर्क केले आहे. नझुल जमिनीवर किती लोक राहतात हे बहुतेक सरकारला माहिती नाही. या जमिनीवर भूमाफिया आणि मोठ्या लोकांनी कब्जा केल्याचे केवळ त्यांना सांगण्यात आल्याचे दिसते. त्यापासून त्यांना मुक्ती हवी आहे. मोठी-मोठी मंदिरंही याच जमिनीवर आहेत. ही मंदिरं तोडावी लागतील. गोंडा शहर 70 टक्के या जमिनीवर आहे. आग्रा आणि अयोध्या या शहरांचीही हीच स्थिती असल्याचे सिंह यांनी सांगितले.

मुख्यमंत्री योगींनी हा कायदा विधान परिषदेतून मागे घेतल्याने त्यांचे सिंह यांनी आभारही मानले आहेत. यूपी विधानसभेत हा कायदा मंजूर झाला होता. पण विधान परिषदेत भाजप आमदारांनीच त्याला विरोध केल्याने हे विधेयक समितीकडे पाठवण्यात आले. त्यामुळे पुढील काही दिवस तरी हा कायदा पुन्हा विधान परिषदेत येणार नाही, असे दिसते.

काय आहे नझुल संपत्ती विधेयक?

नझुल संपत्ती म्हणजे वारसदार नसलेली संपत्ती किंवा जमीन. सरकारकडे या संपत्तीचा ताबा असतो. प्रत्येक राज्यात या जमिनींच्या वापराबाबत कायदा आहे. उत्तर प्रदेश सरकार या जमिनींबाबत नवीन कायदा आणत आहे. त्यानुसार या जमिनी पुढील काळात केवळ सरकारी कामांसाठी वापरण्यात येतील, अशी तरतूद आहे. आतापर्यंत या जमिनी खासगी व्यक्ती, संस्थांना लीझवर किंवा भाडेतत्वावरील वापरास दिल्या जात आहेत. पण त्यावर भूमाफियांनी कब्जा केल्याचे प्रकार घडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT