Rahul Gandhi first Reaction : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन 152 मतांनी विजयी झाले आहेत. इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा एनडीएकडून होत आहे. इंडिया आघाडीची प्रत्यक्षात 315 मते असताना त्यांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना केवळ 300 मते मिळाली. यावरून उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
राहुल गांधी हे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपल्यानंतर बुधवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या प्रवासादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवून जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी बिहारमध्ये एका कार्यकर्त्याने केलेल्या विधानावर राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जात होती.
यादरम्यान मीडियाशी बोलताना राहुल यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगवर भाष्य केले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राहुल यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी ‘वोट चोर, गद्दी छोड’ असे चार शब्दांत उत्तर दिले. त्यानंतर या निवडणुकीतही मतचोरी झाली, असे तुम्हीला वाटतंय का, त्यावर त्यांनी ‘शंभर टक्के’ असे उत्तर दिले. हे संपूर्ण देशात होत असून उत्तर प्रदेशातही सुरू असल्याचेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेनंतर आता भाजपनेही पलटवार केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला म्हणाले, मतचोरीचे माहिती नाही पण राहुल गांधींनी सांगावं, की काँग्रेस नेत्यांचा मेंदूच चोरीला गेला आहे का? उपराष्ट्रपती निवडणुकीतील सद्सद्विवेकबुध्दीलाही ते मतचोरी म्हणत आहेत. त्यांचा हा प्रपोगंडा कधी थांबणार, असा सवाल पुनावाला यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटल्याचे मान्य केले आहे. पण ही मते महाराष्ट्रातील नाहीत, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील एनडीएच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीची मते फुटल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेससह ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केल्याचा दावा या नेत्यांकडून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.