Mukhtar Abbas Naqvi News, Narendra Modi News, Vice-President Election News updates sarkarnama
देश

उपराष्ट्रपती निवडणुक : नक्वींच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये पेच!

Vice-President Election : नुपूर शर्मा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम नेत्याला उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची भाजपच्या 'अंतस्थ' योजना असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना भाजपचे (BJP) 'शत प्रतिशत' व अचूक मतदान व्हावे यासाठी भाजप नेतृत्वाने कंबर कसली आहे.

येत्या शनिवारी (ता.१६ जुलै) भाजपच्या लोकसभा-राज्यसभा खासदारांसाठी दिल्लीत 'डिनर' आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेजवानीच्या निमित्ताने दोन्ही सदनांतील भाजप खासदारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान कसे करावे याबाबत विस्ताराने मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे. दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठी मुख्तार अब्बास नक्वीं यांचे नाव पुढे येत असतांना संघपरिवारातून यास कडाडून विरोध होत असल्याची चर्चा होत असल्याने नक्वींच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये पेच निर्माण झाला आहे.(Vice-President Election News updates)

भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळाची बैठकही येत्या शनिवारीच होत असून तीत उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या उमेदवारच्या नावावर मुख्यतः चर्चा होणार आहे. नुपूर शर्मा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम नेत्याला उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची भाजपच्या नेतृत्वाची 'अंतस्थ' योजना असल्याचे सांगितले जाते. मात्र या कल्पनेला संघपरिवारातून कडाडून विरोध सुरू झाल्याचे समजते.

संघाच्या छत्राखाली काही संघटनांच्या प्रमुख नेत्यांच्या गोटातून संघाचे भाजपमधील प्रतीनिधी बी.एल.संतोष यांच्यापर्यंत हा विरोध पोहोचविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आपली यावरील मन की बात 'एलेव्हन्थ अवर' ला बदलणार काय, हाही उत्सुकतेचा विषय मानला जातो. दरम्यान उपराष्ट्रपतीपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून नक्वींच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतांना त्यांच्या उमेदवारीवर भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत होते की नाही हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधानांसह प्रमुख भाजप नेते भाजप खासदारांसाठी आयोजित केलेल्या डिनरसाठी संसदीय ग्रंथालयातील बालयोगी सभागृहात पोहोचतील. भाजप खासदारांनी शनिवारी सायंकाळी ५ पर्यंत दिल्लीत पोहोचावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील तज्ज्ञ राष्ट्रपतीपदाच्या मतदानाबाबत भाजप खासदारांना सविस्तर मार्गदर्शन करतील. हे मतदान मतपत्रिकेद्वारे होणार आहे. त्यामुळे मत कसे द्यावे, मुर्मू यांच्या नावासमोर पहिल्या पसंतीचे मतदान कसे करावे इथपासून स्वतःच्या पेनने मतदान करू नये. राज्यसभा सचिवालयातर्फे दिल्या जाणाऱ्या पेननेच मतदान करा, इथपर्यंतच्या बारीकसारीक सूचना प्रात्यक्षिकांसाह देण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT