mathura shri krishna janmasthan
mathura shri krishna janmasthan Sarkarnama
देश

ज्ञानवापीनंतर मथुरेतही व्हिडीओग्राफी सर्वेक्षण : उच्च न्यायालयाचे आदेश

सरकारनामा ब्यूरो

वाराणसी : काही दिवसांपूर्वीच वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीचे व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. आता या पाठोपाठ मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणातही व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पीयूष अग्रवाल यांच्या खंडपीठाने आज (२९ अॉगस्ट) हा आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशामुळे आता ज्ञानवापी मशिदीनंतर मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी परिसराचं व्हिडीओग्राफी सर्वेक्षण होणार आहे. (latest Marathi News)

हे प्रकरण पुढील चार महिन्यात निकाली काढण्यात यावं, तसेच याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करावा, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटले आहे. मागील एक वर्षापासून मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद मथुरा जिल्हा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण वर्षभरापासून प्रलंबित असल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती.

संबधित व्हिडीओग्राफी सर्वेक्षण पार पाडण्यासाठी एक वकील आयुक्त आणि दोन सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वादी आणि प्रतिवादी यांच्याशिवाय जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. मनीष यादव या व्यक्तीने भगवान श्रीकृष्ण विराजमानतर्फे मथुरा जिल्हा न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचं सर्वेक्षण करावं, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.

याचिका दाखल करून एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे. पण या अर्जावरील सुनावणी अजूनही पूर्ण झाली नाही. यामुळेच याचिकाकर्ते मनीष यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेऊन, या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती. यावर उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी जागेचं व्हिडीओग्राफीद्वारे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT