Vietnam Speedboat Accident : व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ 'फू क्वॉक' बेटाजवळ शनिवारी झालेल्या भीषण स्पीडबोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 23 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. बचावलेल्या दोघा भारतीयांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
या दुर्घटनेनंतर व्हिएतनाम सरकारने चौकशीचे आदेश दिले असून भारतीय दूतावासही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पीडबोटमध्ये 32 भारतीय पर्यटकांसह चार कर्मचारी प्रवास करत होते. आन थोई द्वीपसमूहातील 'होन माय रुट न्गोआई' बेटाजवळ किनाऱ्यापासून सुमारे 400 मीटर अंतरावर असताना बोटीच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर काही क्षणांतच बोट असंतुलित होऊन उलटली.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे अनेक पर्यटकांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील पर्यटन नौका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्यात अडकलेल्या प्रवाशांकडे लाइफ फ्लोटर्स फेकण्यात आले. त्यानंतर सीमारक्षक दल, नौदल, तटरक्षक दल आणि अन्य बचाव यंत्रणांनी संयुक्तपणे शोध आणि बचाव मोहीम राबवली. 23 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
किनाऱ्यावर आणल्यानंतर काही जणांना तातडीने सीपीआर देण्यात आला, तसेच वैद्यकीय पथकाने उपचार सुरू केले. मृतांमध्ये तमिळनाडूतील 10, आंध्र प्रदेशातील 2 आणि केरळमधील 2 पर्यटकांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. उर्वरित मृत व्यक्तीची ओळख आणि इतर तपशील अधिकृतपणे जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. या दुर्घटनेच्या वेळी समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटा असल्याची माहिती समोर आली आहे.
हवामानासह बोटीतील तांत्रिक बिघाड या दोन्ही बाबींचा तपास केला जात असून दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी व्हिएतनाम सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरील संदेशात म्हटले की, व्हिएतनाममध्ये भारतीय नागरिकांशी संबंधित बोट दुर्घटनेची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे.
तसेच व्हिएतनाममधील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासाकडून सर्वतोपरी मदत केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर, फू क्वॉक हे व्हिएतनाममधील लोकप्रिय पर्यटनस्थळ जगभरातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पर्यटन सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.