

Mumbai AC Local Marathi Language Dispute : मुंबईतील वातानुकूलित (AC) लोकलमध्ये तिकीट तपासणीदरम्यान भाषेच्या मुद्द्यावरून प्रवासी आणि तिकीट तपासनीस यांच्यात वाद झाल्याची घटना समोर आली आहे.
मराठी एकीकरण समितीने या प्रकरणात प्रवाशाला वैध तिकीट असतानाही अंधेरी येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) कार्यालयात सुमारे दोन तास बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेने या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai) नालासोपारा येथील तुकाराम हेगडे शनिवारी (11 जुलै) AC लोकलने नालासोपारा ते दादर असा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान तिकीट तपासनीस युवराज कुमार यांनी हिंदीत तिकीटाची विचारणा केली. त्यावर हेगडे यांनी मराठीत संवाद साधण्याची विनंती केली. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या वेळी मराठी भाषिक तिकीट तपासनीस साईप्रसाद सावंत यांनी हस्तक्षेप केल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सावंत प्रवाशाला रेल्वेचे नियम समजावून सांगताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. घटनेदरम्यान प्रवासी आणि तिकीट तपासनीस यांनी एकमेकांचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे.
यानंतर हेगडे यांना अंधेरी स्थानकावर उतरवून RPF कार्यालयात नेण्यात आले आणि तेथे सुमारे दोन तास बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, मराठी एकीकरण समितीने रेल्वे पोलिसांकडे लेखी निवेदन देत संबंधित तिकीट तपासनीसांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. मराठीत संवाद साधण्याची मागणी करणे हा सरकारी कामात अडथळा ठरत नसल्याचा समितीचा दावा आहे. तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता प्रवाशाला ताब्यात ठेवणे हे भाषिक हक्कांचे उल्लंघन असल्याचेही समितीने निवेदनात म्हटले आहे.
दुसरीकडे, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी अंधेरी स्थानकावर टीसी आणि एका प्रवाशामध्ये भाषेच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून चौकशी अहवालानंतर आवश्यक ती पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.