BJP state in-charges : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसह विविध विभागांच्या प्रमुखांच्या नव्याने नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश आहे. खासदार विनोद तावडे यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवत राष्ट्रीय सरचिटणीस पुनर्नियुक्ती केली आहे. त्यानंतर काही तासांतच तावडे यांच्या खांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.
पुढील वर्षी देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, गुजरात यांसह अन्य काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी उत्तर प्रदेशमधील निवडणूक गेमचेंजर ठरणारी आहे. मागील दोन टर्म राज्यात भाजपने सत्ता मिळवत आपला दबदबा कायम ठेवला आहे. आता हॅटट्रिक करत इतिहास घडविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळविण्याची जबाबदारी भाजपने विनोद तावडे यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्यांची राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सचिव जगदीश पटेल हे सहप्रभारी असतील. मागील वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी बिहार, केरळ या राज्यांमध्येही तावडे हे प्रभारी होते.
बिहारमध्ये भाजपने पहिल्यांदाच सर्वाधिक जागा मिळविल्या. तर केरळमध्येही दोन आमदार निवडून आले. एनडीएतील समन्वयकाच्या भूमिकेतही तावडेंची कामगिरी सरस ठरली आहे. २०२० मध्ये राष्ट्रीय संघटनेत एन्ट्री केल्यापासून त्यांनी नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे २०२१ पासून राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या तावडेंवर पुन्हा विश्वास टाकण्यात आला.
आता तावडेंकडे उत्तर प्रदेशची आव्हानात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. मागील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला होता. पक्षाला केवळ ३३ जागा मिळाल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीत हा आकडा ८० पैकी तब्बल ६२ एवढा होता. मागील निवडणुकीतील अपयशामुळे केंद्रात एकहाती सत्तेपासून भाजपला दूर राहावे लागले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी महत्वाची मानली जात आहे.
उत्तर प्रदेशला केंद्रातील सत्तेचा केंद्रबिंदु मानले जाते. त्यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करण्यासाठी तावडे यांच्यासारख्या संघटनकौशल्यात पारंगत असलेल्या अनुभव्या नेत्यावर ही जबाबदारी टाकली आहे. काही महिन्यांपासून तावडे हेही उत्तर प्रदेशमध्ये सक्रीय असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. पक्षसंघटनेशी संबंधित महत्वाच्या बैठकांमध्येही त्यांची उपस्थिती असेत. आता प्रभारीपद मिळाल्याने त्यांचा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये सक्रीय सहभाग असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.