India Alliance Sarkarnama
देश

India Alliance : 'इंडिया'ला धक्के बसण्यास सुरूवात; ममता बॅनर्जी यांनी बैठकीआधीच दिले संकेत

सरकारनामा ब्यूरो

Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील दारूण पराभवानंतर इंडिया आघाडीला धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिला धक्का दिला आहे. आघाडीच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीबाबत माहिती नसल्याचे सांगत नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या बैठकीला जाणार की नाही, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी येत्या बुधवारी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. आघाडीतील २८ घटक पक्षांना त्यांनी निमंत्रित केल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत काँग्रेसचा तीन राज्यात झालेला पराभव तसेच आगामी लोकसभा निवडणुकीबाबत रणनीतीवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. (West Bengal CM Mamata Banerjee)

तीन राज्यांतील पराभवामुळे मात्र आघाडीतील सुसंवादावर परिणाम होईल, अशी वक्तव्य आता घटक पक्षांतील नेत्यांकडून केली जाऊ लागली आहेत. निवडणुकीआधीच जागा वाटपावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली होती. बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमारही नाराज असल्याची चर्चा होती. निकालानंतरही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत अधिकच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी घटक पक्षांकडून काँग्रेसवर दबाव टाकला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी आपल्याला इंडिया आघाडीच्या बैठकीते निमंत्रण नसल्याचा दावा केला आहे. बैठकीविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, मला बैठकीबाबत माहिती नाही, त्यामुळे उत्तर बंगालमध्ये मी एक कार्यक्रम ठेवला आहे. आम्हाला याबाबत माहिती मिळाली असती तर कार्यक्रमाचे नियोजन केले नसते. मी बैठकीला नक्कीच गेले असते, पण त्याबाबत माहितीच मिळाली नाही, असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याचप्रमाणे, बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजीही व्यक्त केली आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी जागा वाटपाबाबत चर्चा केली नाही. त्यामुळे या पक्षांमुळे काँग्रेसची मते कमी झाली. हे जागावाटप झाले असते तर तेलंगणाप्रमाणेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसचा विजय झाला असता. हा जनतेचा नव्हे तर काँग्रेसचा पराभव आहे, असा टोला बॅनर्जी यांनी लगावला आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT