पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ टिकून असलेला ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला यंदा भाजपने पोखरला आहे. पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळापासून तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ममता बॅनर्जी यांचे वर्चस्व टिकून ठेवले होते. देशभरात भाजपची ताकद वाढत असतानाही हा गड मात्र अभेद्य मानला जात होता.
पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या कलांनी चित्र मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये आता मोठे राजकीय बदल घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मागील 15 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे सरकार येथे सत्तेत होते. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या कलानुसार परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे.
राज्यातील एकूण 293 जागांसाठी मतमोजणी सुरू असून बहुमतासाठी 148 जागांची गरज आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपने 159 जागांवर आघाडी घेतली आहे, तर तृणमूल काँग्रेस 123 जागांवर आघाडीवर आहे. हे चित्र कायम राहिल्यास पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हा निकाल केवळ राजकीय बदल नाही, तर ऐतिहासिक सत्तांतर म्हणून पाहिला जात आहे.
या निवडणुकीत केवळ जागांची लढाई नव्हती, तर ‘7 M फॅक्टर’ निर्णायक ठरले आहेत. पहिला घटक म्हणजे मुस्लिम मतदार. राज्यात सुमारे 30% मुस्लिम लोकसंख्या असून अनेक मतदारसंघांत त्यांचा प्रभाव निर्णायक आहे. पारंपरिकरित्या तृणमूल काँग्रेसकडे झुकणारा हा मतदारवर्ग यावेळी काही प्रमाणात विभागला गेला. हुमायूं कबीर यांनी स्थापन केलेल्या ‘आम जनता उन्नयन पार्टी’मुळे नवीन समीकरणे तयार झाली.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला मतदार. ममता बॅनर्जी यांच्या योजनांनी महिलांमध्ये मोठा पाठिंबा मिळवला असला, तरी केंद्र सरकारच्या योजना आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर भाजपनेही या वर्गात प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला मतदार यावेळी किंगमेकर ठरले.
तिसरा घटक म्हणजे स्थलांतरित कामगार. राज्याबाहेर काम करणारे हजारो बंगाली कामगार मतदानासाठी परतले. बेरोजगारी आणि रोजगाराच्या मुद्द्यांमुळे त्यांच्या मतदानावर प्रभाव पडल्याचे दिसले.
चौथा मतुआ समाजाचा प्रभाव नागरिकत्वाशी संबंधित मुद्द्यांमुळे हा समाज निवडणुकीत महत्त्वाचा ठरला.. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे या समाजाच्या अपेक्षा वाढल्या असून भाजपने त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
पाचवा घटक म्हणजे संघटनात्मक ताकद. भाजपने गेल्या काही वर्षांत आपले जाळे मजबूत केले, तर तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेटवर्क आधीपासूनच भक्कम आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने केलेल्या कडक उपाययोजनांनीही मतदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढवली.
सहावा ‘ममता फॅक्टर’ होता. ममता बॅनर्जी यांची प्रतिमा आणि जनसंपर्क ही त्यांच्या पक्षाची मोठी ताकद राहिली. हा सामना अनेक ठिकाणी ‘दीदी विरुद्ध इतर’ असा झाला.
शेवटचा आणि महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे ‘मोदी फॅक्टर’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, रोडशो आणि योजनांनी भाजपला मोठी ऊर्जा दिली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे नवीन मतदार जोडले गेले.
एकंदरीत, या सात घटकांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक पूर्णपणे बदलून टाकली असून अंतिम निकालातही यांचा ठसा स्पष्टपणे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.