Election Commission update : संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन सत्ताधारी एनडीएसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या अधिवेशनात NDA ची ताकद वाढलेली दिसणार आहे. महाराष्ट्रात उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ सहाने वाढले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणणूल काँग्रेसच्या २० खासदारांनी बंड करत एनडीएला पाठिंबा जाहीर केला आहे.
आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २०८ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. तर तृणमूलला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. तब्बल २० खासदारांनी बंड करत लोकसभेत स्वतंत्र गट बनवत एनसीपीआय पक्षात विलीन होण्याचा निर्णय जाहीर केला. यादरम्यान राज्यसभेतील तीन खासदारांनीही राजीनामा दिला.
सुखेंदू शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बराइक यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी आता आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २४ जुलैला ही निवडणूक होणार असून त्यादिवशी निकालही आहे. सध्याचे बंगालमधील संख्याबळ पाहता दोन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील. तर एका जागेचा पेच निर्माण होईल. पण टीएमसीच्या बंडखोर आमदारांनी भाजपला साथ दिल्यास किंवा भाजपच्या अतिरिक्त मते बंडखोरांच्या पारड्यात पडल्यास या जागेचा पेचही सुटू शकतो. असे झाल्यास संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच हा निकाल लागणार आहे. त्यामुळे एनडीएचे राज्यसभेतील संख्याबळ तीनने वाढून १५५ वर जाईल.
दरम्यान, लोकसभेतील एनडीएचे संख्याबळही २६ ने वाढले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदेंची साथ दिली आहे. तृणमूलच्या २० खासदारांनी एनडीएला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यसभेच्या तीन जागा वाढणार आहे. दुसरीकडे विरोधकांची ताकद कमी होताना दिसत आहे.
अधिवेशनात सरकारकडून काही महत्वाची विधेयक सादर केली जाऊ शकतात. त्यामध्ये डिलिमिटेशन बिलाचा समावेश असू शकतो. मागील अधिवेशनात दोन तृतियांश बहुमताअभावी हे विधेयक सरकारला पारित करता आले नव्हते. आता विरोधकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सरकारकडून विधेयकामध्ये काही बदलही केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
अजूनही लोकसभेत दोन तृतियांश बहुमतापासून सरकार खूप दूर आहे. अधिवेशनाआधी ही कसर भरून काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यासाठी समाजवादी पार्टी व अन्य काही पक्षांचे खासदार आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनाआधी किंवा अधिवेशनादरम्यान मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.