TMC vs BJP : पश्चिम बंगाल हा कधीकाळी डाव्यांचा बालेकिल्ला होता. जवळपास 4 दशके मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता राज्यात होती. 2011 मध्ये मात्र ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालची निवडणूक जिंकली अन् डाव्यांना राज्यातून हद्दपारच केले. आज राज्यात डावे तोंडी लावायला सुद्धा सापडत नाहीत. आता ममता बॅनर्जी यांच्याही सत्तेला सुरुंग लावण्याची तयारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गडाला सन 2011 मध्ये हादरे दिल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाची पोकळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरून काढल्याचे चित्र आहे. संघाच्या पश्चिम बंगालमध्ये केवळ 830 शाखा होत्या आणि 2006 पूर्वी तर त्या 500 हूनही कमी होत्या. सन 2016च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पश्चिम बंगालमध्ये आणखी घट्ट पाय रोवले आणि जानेवारी 2017 पर्यंत शाखांची संख्या 1496 वर पोहोचली.
संघ आपल्या असंख्य सहयोगी संस्थांमार्फत राज्यभर आपली भूमिका पुढे नेत आहे. या संघटना विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. शाळा, महाविद्यालये, सांस्कृतिक क्षेत्र येथे या संस्था कार्यरत आहेत. हिंदुत्वाच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. ‘आरएसएस’च्या शाखांचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. शाखा, मिलन आणि संघमंडळी या प्रकारांमध्ये त्याचे वर्गीकरण करण्यात येते. शाखा रोज भरते, तर मिलन साप्ताहिक असते आणि संघमंडळी पाक्षिक आणि मासिक कालावधीमध्ये होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ममता बॅनर्जी यांच्यावर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप सातत्याने पुढे रेटला. त्याचा हिंदू मतदारांवर नक्कीच प्रभाव पडला. मात्र, ही कथा 2011 च्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळे एक नवी रणनीती आवश्यक ठरली. राजकीय तज्ज्ञ विश्वनाथ चक्रवर्ती यांच्या मते, डाव्यांनी हळूहळू आपली ताकद गमावल्याने, पूर्वी धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी मानले जाणारे अनेक हिंदू मतदार आता हिंदुत्ववादी रचितकथनाला पाठिंबा देऊ लागले आहेत.
धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या मूल्यांना मानणाऱ्या व्यक्तींमध्ये मूलभूत वैचारिक बदल झाला आहे. आता त्यापैकी अनेक जण कडव्या किंवा सौम्य हिंदुत्वाचे समर्थक झाले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. दुसऱ्या बाजूला, या हिंदू एकजुटीचा फायदा केवळ भाजपलाच झाला नाही, तर अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसलाही झाला, कारण यामुळे अल्पसंख्याक मतदारांना एकत्र करून तृणमूल काँग्रेसच्या बाजूने आकर्षित करता आले. सन 2021 च्या विधानसभा निवडणुकीतील तृणमूल काँग्रेसला त्याचा चांगला फायदा झाला.
मार्चमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्व तीन प्रकारांच्या एकूण 4540 शाखा कार्यरत आहेत. भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपली हिंदुत्ववादी राजकारणाची धार वाढवताना, संघाने तळागाळात केलेले कामही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हेच सूक्ष्म पातळीवरचे प्रयत्न भाजपला बंगालमध्ये हिंदू मतांचे संकलन करण्यात मदत करत आहेत. याच पायाभूत कामामुळे भाजपने 2019 मध्ये पश्चिम बंगालमधील 18 लोकसभा जागा जिंकल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.