Old Parliament building  Sarkarnama
देश

Old Parliament Building : जुन्या संसद भवनाचं काय करणार? पाडणार की...

New Parliament Building Inauguration: जुने संसद भवन पाडले जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Old Parliament Building: अखेर '28 मे'ला नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख ठरली आहे. पंतप्रधान मोदी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. पण जुन्या इमारतीचे आता काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जुने संसद भवन पाडले जाणार का?

ब्रिटिश राजवटीत बांधलेले जुने संसद भवन भारताच्या 97 वर्षांच्या राजकीय इतिहासाचे साक्षीदार आहे.परंतू संसदेची जुनी इमारत आता जुनी झाली असून जीर्ण झाली आहे,तसेच सोयी-सुविधा देखील कमी पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 ला लोकसभा आणि राज्यसभेने सरकारला संसदेसाठी नवीन इमारत बांधण्याची विनंती केली होती . यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० ला नवीन संसद भवनाचे भूमीपूजन केले होते. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा अनेक ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार असा प्रश्न लोकांच्या मनात येत असेल.

सध्याच्या संसद भवनाचे काय होणार?

मार्च 2021 मध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवीन संसद भवन बांधल्यानंतर या जुन्या इमारतीची दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले होते.या वास्तुचे पुरातत्वीय महत्त्व लक्षात घेऊन सरकार त्याचे जतन करण्याचा विचार करत आहे. ही इमारत पाडली जाणार नसून तिचे जतन केले जाईल. त्या इमारतीचा उपयोग संसदेतील संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला जाईल. नवीन संसद भवन बांधल्यानंतरही जुन्या इमारतीचा वापर सुरूच राहणार असून,दोन्ही इमारती एकमेकांना पूरक म्हणून काम करतील. 2022 च्या अहवालानुसार, जुन्या संसद भवनाचे संग्रहालयात रूपांतर केले जाणार आहे.

कसे आहे जुने संसद भवन?

संसदेची सध्याची इमारत ही देशातील सर्वात भव्य इमारतींपैकी एक आहे, जी प्रसिद्ध वास्तुविशारद 'सर एडविन लुटियन्स' आणि 'सर हर्बर्ट बेकर' यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आली होती. 12 फेब्रुवारी 1921 ला 'द ड्यूक ऑफ कॅनॉट' यांनी जुन्या संसद भवनाची पायाभरणी केली होती. १८ जानेवारी १९२७ ला भारताचे तत्कालीन 'व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन' यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते.

सध्याचे संसद भवन सहा वर्षांत ८३ लाख रुपये खर्चून बांधण्यात आले. केंद्रीय विधानसभेची पहिली बैठक 19 जानेवारी 1927 ला झाली. सध्याची इमारत वर्तुळाकार असून तिचा व्यास 560 फूट, घेर एक तृतीयांश मैल आणि क्षेत्रफळ सुमारे सहा एकर आहे, ज्यामध्ये 144 खांब आणि 12 दरवाजे आहेत.

नवीन संसद भवनाची भव्यता

नवीन संसद भवनातील लोकसभेच्या चेंबरमध्ये 888 सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे. तसेच 384 सदस्य राज्यसभेत बसू शकणार आहेत. संयुक्त अधिवेशनात 1272 सदस्यांसाठी आसनव्यवस्था असेल. नवीन संसद भवनात लोकसभा राष्ट्रीय पक्षी मोराच्या आकारात असणार आहे, तर राज्यसभा राष्ट्रीय पुष्प कमळाच्या आकारात आणि भूकंप प्रतिरोधक डिझाइनमध्ये तयार करण्यात आली आहे. प्रत्येक सदस्याच्या आसनावर डिजिटल प्रणाली युक्त कम्पुटर आणि टच स्क्रीन आहे. म्हणजेच संसदेची नवीन इमारत हायटेक असणार आहे.

Edited by- Rashmi Mane

SCROLL FOR NEXT