Manoj Narawane Book: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील एका परिच्छेदाचा उल्लेख केला. पण राहुल गांधींना आपलं वाक्यही पूर्ण करुन देता भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांनी त्यांना जोरदार विरोध करत लोकसभेत गोंधळ घातला त्यामुळं लोकसभा अध्यक्षांनी तीनदा कामकाज बंद पाडलं. पण या पुस्तकात नेमकं असं काय लिहिलं आहे, ज्याची अडचण मोदी सरकारला वाटते आहे? जाणून घेऊयात. काँग्रेसनं या पुस्तकातील हे वादग्रस्त मुद्दे पुस्तकाच्या पानांसह समोर आणले आहेत.
राहुल गांधींनी लोकसभेत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. यामध्ये चीनचे चार रणगाडे डोकलाम भागात भारताच्या सीमेपासून केवळ १०० मीटर दूर होते. कैलास पर्वत रांगांमध्ये त्यांनी प्रवेश केला होता, इतकीच माहिती त्यांनी दिली. त्यांना पुढे आणखीही काही बोलायचं होतं पण त्याचवेळी तात्काळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आपल्या जागेवर उठून उभे राहिले आणि राहुल गांधी यांच्या माहितीवर आक्षेप घेतला. एखाद्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ तुम्ही सभागृहात देऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर पुन्हा राहुल गांधी आपला मुद्दा मांडताना राष्ट्रीय सुरक्षेचा हा मुद्दा असल्याचं सांगत बोलण्याचा प्रयत्न केला त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजी हे उभे राहिले आणि राहुल गांधींनी सभागृहाच्या नियमांचा भंग करु नये असं म्हटलं. त्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील राहुल गांधींना नियम दाखवत तुम्ही कुठल्याही प्रकाशित किंवा अप्रकाशित पुस्तकं आणि वर्तमान पत्रांचा संदर्भत सभागृहात देऊ शकत नाही कारण तसं नियमात बसत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर थेट गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राहुल गांधींना थांबवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही स्वतःच सांगता की हे अप्रकाशित पुस्तक आहे तर मग त्यावर तुम्ही कसे काय बोलू शकता? असा सवाल यावेळी शहांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी नरवणेचं हे पुस्तक सरकारच जाणीवपूर्वक प्रकाशित होऊ देत नाहीए, पण कारवाँ मासिकात या पुस्तकात नेमकं काय म्हटलं आहे याबाबत एक लेख छापून आला आहे त्याला मी कोट करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या भूमिकेला समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही पाठिंबा दिला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानं त्यांना बोलू द्यायला हवं असंही त्यांनी म्हटलं. पण विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांचा गोंधळ वाढतच असल्यानं लोकसभा अध्यक्षांनी दोन वेळा सभागृह तासाभरासाठी स्थगित केलं. पण राहुल गांधींनी आपला मुद्दा पूर्ण करता आला नाही.
दरम्यान, माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या अप्रकाशित पुस्तकातील तो वादग्रस्त मजकूर समोर आला असून काँग्रेसनं आपल्या सोशल मीडियावरही तो शेअर केला आहे. यात म्हटलं की, "लेफ्टनंट जनरल योगेश जोशी, जे भारतीय सैन्याच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख आहेत, त्यांना ३१ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८.१५ वाजता एक फोन आला. या फोनवर त्यांना जी माहिती मिळाली त्यावरुन ते चिंतेत पडले. इन्फंट्रीच्या मदतीनं चार चिनी रणगाडे पूर्व लडाखमध्ये रेचिन ला भागातील एका उंच डोंगराळ रस्त्यानं पुढे येत होते. जोशी यांनी चीनच्या या हालचालीची माहिती लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना दिली. त्यानंतर त्यांना तातडीनं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं, त्यानुसार, हे चीनी रणगाडे कैलाश रेंजजवळ भारतीय हद्दीपासून शंभर मीटर अंतरावर होते. ही एक रणनीतीक मोक्याची जागा होती. ज्यावर काही वेळापूर्वीच भारतीय सैन्यानं कब्जा केला होता. वादग्रस्त लाईन ऑफ अॅक्च्युअल कन्ट्रोल जी भारत-चीन या दोन्ही देशांमधील खरी सीमा आहे. या भागात उंचावरील प्रत्येक मीटर जागा ही रणनीतीच्या दृष्टीनं महत्वाची ठरते. यावेळी भारतीय सैनिकांनी एक इल्युमिनेटिंग राऊंड फायर केला. हा एक प्रकारचा चीनी सैनिकांना इशारा होता. पण याचा चीनी रणगाड्यांवर कुठलाच परिणाम झाला नाही ते पुढे येतच होते. यानंतर लष्कर प्रमुखांनी तातडीनं भारताचे राजनैतिक आणि प्रमुख राजकीय नेत्यांना फोन करायला सुरुवात केली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा समावेश होता. यावेळी ते सातत्यानं विचारत होते की माझ्यासाठी काय आदेश आहेत? कारण परिस्थिती खूपच बिघडत होती"
यानंतर नरवणे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना फोन केला, पण त्यांना कुठलेही निर्देश मिळाले नाहीत. पण त्याचवेळी त्यांना PLA कमांडर मेजर जनरल लियू लिन यांचा एक मेसेज आला की या परिस्थितीवर नियंत्रणासाठी दोन्ही बाजुंनी शांत राहणं गरजेचं आहे. पण चिनी रणगाडे थांबत नव्हते. त्यावर नरवणेंना लेफ्टनंट जनरल जोशींनी दिलेला एक सल्ला लक्षात होता की, चिनी सैन्याला थांबवण्याचा एकमेव तोडगा म्हणजे आपल्या मिडीयम आर्टिलरीनं फायरिंग करणं, यासाठी या अर्टिलरी गनही तयार होत्या, केवळ आदेशाची वाट पाहत होत्या.
पाकिस्तासमोर या आर्टिलरी फायर करणं ही सामान्य गोष्ट आहे पण इथं समोर चीन होता. जर इथं आर्टिलरी फायर केलं असतं तर खूपच नाजूक स्थिती निर्माण झाली असती. पण सरकारही दुसरीकडं स्पष्ट आदेश देत नसल्यानं नरवणे हे मध्येच अडकून राहिले होते. त्याचवेळी लष्करी मुख्यालयात विविध पर्यायावर चर्चा झडत होत्या. त्याचदरम्यान, नरवणे यांनी संरक्षणमंत्र्यांना आणखी एक फोन केला. त्यानंतर त्यांना पुन्हा फोन करु असं सांगण्यात आलं. यावेळी प्रत्येक मिनिट महत्वाचा होता कारण चिनी रणगाडे पुढेच येत होते. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी रात्री साडेदहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला तेव्हा त्यांना एकाच वाक्यात निर्देश मिळाले की, जे योग्य वाटतंय ते करा. पण यामुळं कुठलाही स्पष्ट निर्णय झाला नव्हता. उलट "माझ्या हातात एक उकडलेला गरम बटाटा ठेवण्यात आला होता. त्यामुळं संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच आली होती," हा वाक्रप्रचार माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंब नरवणे यांनी आपल्या पुस्तकात वापरला आहे. म्हणजेच एक असा वादग्रस्त आणि संवेदनशील मुद्दा जो हाताळण्यापासून सर्वचजण स्वतःला दूर ठेवत असतात किंवा एखादी अवघड जबाबदारी मुद्दाम दुसऱ्यावर सोपवली जाते, अशी आपली गत झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.