Karnataka Hijab Row
Karnataka Hijab Row Sarkarnama
देश

भगवं उपरणं घातलेल्या जमावाला मुस्लिम विद्यार्थिनी एकटीच भिडली! पहा व्हिडीओ

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बुरख्याचा वाद चांगलाच पेटला आहे. मुस्लिम विद्यार्थिनींना महाविद्यालयात बुरखा (Hijab) घालून येण्यास अनेक ठिकाणी मज्जाव करण्यात आला आहे. त्याविरोधात मुस्लिम विद्यार्थिनींमध्ये रोष वाढू लागला आहे. तर दुसरीकडे भगवं उपरणं घातलेल्या विद्यार्थ्यांकडून बुरखाबंदीच्या समर्थन केलं जात आहे. हे विद्यार्थी आणि बुरखा घातलेल्या विद्यार्थीनी समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाल्याच्या घटनाही घडत आहेत. (Karnataka Hijab Row)

कर्नाटकातील एका महाविद्यालयत तर बुरखा घातलेली मुस्लिम विद्यार्थिनी भगवं उपरणं घातलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला एकटीच भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही विद्यार्थिनी महाविद्यालयात आपली दुचाकी पार्किंगमध्ये लावून वर्गाकडे निघाली होती. त्याचेवळी घातलेल्या विद्यार्थ्यांनी जोरजोरात जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरूवात केली.

पण या घोषणांनी न थांबता ही विद्यार्थिनीही त्यांना भिडल्याचे व्हिडीओत दिसते. या विद्यार्थिनीनेही अल्लाह हू अकबर अशा घोषणा दिल्या. या घोषणा देतच ती वर्गाच्या दिशेने निघाली. मग विद्यार्थिही तिच्यामागे घोषणा देत निघाले. यावेळी महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना थांबवले. या प्रकारामुळे काहीकाळ महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, उडुपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थींनींचा एक गट आणि भगव्या रंगाचे उपरणं परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या गट समोरासमोर आले. त्यावेळी उपरणं घातलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये घोषणाबाजी करत निदर्शने केली. यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलं आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे.

कर्नाटकात सध्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बुरखा परिधान करण्यावरून वाद सुरू आहे. शाळेत बुरखा घालण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे सांगितले जात आहे. काही ठिकाणी विद्यार्थी भगवे उपरणं घालून निषेधही करत आहेत. आता एकीकडे मुस्लिम विद्यार्थीनी या गोंधळामुळे नाराज आहेत तर दुसरीकडे शाळेतील शिक्षणावरही परिणाम झाला आहे. या वादात कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेत कर्नाटक शिक्षण कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार शाळेतील प्रत्येकाला एकच गणवेश परिधान करावा लागणार आहे. खाजगी शाळांना स्वतःचा गणवेश निवडता येईल. पण सरकारी शाळांमध्ये ठराविक गणवेश घालूनच यावे लागेल, असा आदेश देण्यात आला.

या आदेशानंतर बुरखा वाद आणखीनच वाढला आहे. जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींनी बुरखा परिधान करून महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने सुरू झाला होता. कॉलेज प्रशासनाची मान्यता नसताना हा सर्व प्रकार करण्यात आला. पण नंतर हा ट्रेंड पुढे गेला आणि इतर कॉलेजमधल्या अनेक मुलीही असाच बुरखा घालून येऊ लागल्या. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्या निषेधाला प्रतिसाद देण्यासाठी भगवे स्कार्फ बांधायला सुरुवात केली. ज्यामुळे हा वाद अधिकच विकोपाला गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT